अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 26 मे : शहरातील क्रांती चौकाजवळील समतानगरात शनि मंदिराजवळ गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक दृश्य पाहून नागरिकच काय पण पोलीसही हादरून गेले होते. तोंडात बोळा कोंबून पिशवीत दोन दिवसांचे बाळ झुडुपात फेकून देण्यात आले होते. वेळीच पोलिसांची मदत मिळाली म्हणून ठीक नाहीतर हे जग पाहण्याआधी बाळाचा जीव धोक्यात आला असता. डायल 112 कर्मचाऱ्यांनी बाळाला ताब्यात घेऊन घाटीत उपचार करवले आणि महिला व बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील भागवत जाधव यांनी डायल 112 ला फोन करुन क्रांती चौकाजवळील समतानगरात शनि मंदिराजवळ एक नवजात अर्भक तोंडात बोळा कोंबून पिशवीत घालून कोणीतरी झुडपात फेकल्याचे कळवले. माहितीमिळाल्यानंतर 112 विभागातील एक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे दोन दिवसांचे अर्भक झुडपात पडलेले आढळले. पथकाने अर्भक ताब्यात घेत लगेच घाटी रुग्णालयात भरती केले.
वाचा - 'द केरला स्टोरी' चित्रपटानंतर पुण्यात लव जिल्हादची केस समोर? चार वर्षानंतर मुलगी वाईट..
बाळावर वेळीच उपचार केले गेल्याने बाळ वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. योग्य उपचार केल्यानंतर बाळाला महिला व बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले. सध्या बाळ सुखरुप आहे. वेळीच मदत मिळाल्याने एका बाळाला जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, पोलीस निरिक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अमलदार व्ही. एच. आझाद, रेहाना शेख, एस. एस. ढवळे, योगेश ठाकूर यांच्या सहकार्याने डायल 112 च्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळाच्या आईचा शोध सुरू
दरम्यान, बाळ सुरक्षित असले तरी आता बाळाच्या आईचा शोध सुरू करण्यात आला आहे. बाळाला इतकं क्रूर पद्धतीने का फेकण्यात आलं? हे बाळा अनैतिक संबंधातून जन्माला आलं असावं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Crime