सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 21 मे : मुलींनी सातच्या आत घरात अशी आपल्याकडे म्हण आहे. मात्र, या समाजाने मुलींना घालून दिलेल्या अटींमध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे ती खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का? हे जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणारी कांचन जाधव महाराष्ट्राची भ्रमंती करत आहे. यादरम्यान ती प्रत्येक ठिकाणी लिफ्ट मागून प्रवास करत आहे. आतापर्यंत तिने 13 जिल्ह्याची यात्रा केली आहे.
कांचन दत्तात्रय जाधव मुळची परभणी जिल्ह्यातील सेलू गावची आहे. कांचन छत्रपती संभाजीनगर मधील एमजीएम कॉलेजमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. कांचनचे वडील जिल्हा परिषद शाळेवरती मुख्याध्यापक आहेत तर आई ही गृहिणी आहे. कांचनचे वडील शिक्षक असल्यामुळे तिला लहानपणापासून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. मात्र, लहानपणापासूनच मुला मुलींमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल तिला अनेक वेळा वेगळा अनुभव आला आणि हाच प्रश्न तिला पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना देखील सतावत होता. यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलीं सुरक्षित आहेत का यासाठी तिने महाराष्ट्राची भ्रमंती करायचा निर्णय घेतला.
घरच्यांनी दिला नकार
लिफ्ट मागून महाराष्ट्राची भ्रमंती करणार असे घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी तिला नकार सांगितला. मात्र, तिने याबद्दल घरच्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिला परवानगी मिळाली. घरातून निघताना तिने गरजेचे साहित्य सोबत घेतले. त्यासोबतच रात्री निवासासाठी टेन्ट सोबत घेतला आणि छत्रपती संभाजीनगरमधून तिचा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत तिने 13 जिल्ह्यांमध्ये लिफ्ट घेऊनच प्रवास केला आहे. यादरम्यान तिने 1300 किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे.
कसा करते प्रवास?
कांचन सकाळी सातपासून सायंकाळी सातपर्यंत लिफ्ट घेऊनच प्रवास करते. सात वाजता पुढचे राहण्याचे ठिकाण शोधते. हॉटेल, शाळा, मंदिर यासारख्या ठिकाणी रात्री टेन्ट टाकून ती विश्रांती करते. यावेळी अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. मात्र, काही जण रात्री मी सुरक्षित आहे की नाही हे बघून जातात, असं कांचनने सांगितले.
वाचा - धारावीच्या झोपडपट्टीतील मुलगी 14व्या वर्षी बनली मॉडेल; फोटो पाहून विश्वास नाही बसणार
हा प्रवास करत असताना फक्त जेवणाचा खर्च येतो. अनेक वेळा लिफ्ट देणारे किंवा विचारपूस करणारे व्यक्ती जेवणही देतात. मी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिफ्ट मागून प्रवास करते. अनेक वेळा तो व्यक्ती विचित्र दिसतोय त्यामुळे आपण त्याला लिफ्ट नको मागायला असा विचार सुरुवातीला डोक्यात यायचा दरम्यान वेगवेगळे अनुभव आले. अनेक लोकं मला विचारपूस करतात. पाच किलोमीटर अंतरावरती जायचं असेल तर व्यक्ती पुढील सुरक्षित 15 किलोमीटर वरती सोडतात.
मोबाईल क्रमांक देतात काही असुरक्षितता वाटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील करतात. यावेळी वडिलांच्या वयाची लोकं मुलगी म्हणून वागणूक देतात तर तिच्या वयाची मुलं तिला बहिणीसारखी वागणूक देतात. आतापर्यंत एकाही व्यक्तीने मला असुरक्षिततेची जाणीव होऊ दिली नाही. प्रत्येक व्यक्ती मला बहीण, मुलगी या भावनेनेच मदत करत आहे. यामुळे मला महाराष्ट्रातील लोकांचा अभिमान वाटतो. त्यासोबतच तुम्ही जर खंबीर असाल तर तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही, असं कांचन आत्मविश्वासाने सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18, Travel