सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च : देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतीची राष्ट्रीय महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली आहे. समाजातील सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या काळी पन्नी या लघुपटाला नुकत्याच मध्यप्रदेशमधील इंदोर येथे झालेल्या कलाकारी फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. यामुळे या कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
काय आहे लघुपटाचा विषय?
काळी पन्नी हा लघुपट देवगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापक राम झिंजुर्डे लिखित दिग्दर्शित लघुपट आहे. या लघुपटामध्ये ग्रामीण भागातील एका गरीब मुलाच्या कथेवर भाष्य करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलाला कुटुंबाच्या मास विक्रीच्या व्यवसायामुळे येणारे कटू अनुभव आणि यामुळे त्या मुलाच्या भावविश्वावर होणारे परिणाम लघुपटात अत्यंत संवेदनशीलपणे हाताळून प्रेक्षकांना दाखवण्यात आले आहेत.
यामध्ये शालेय शिक्षणामध्ये देखील त्या मुलाला येणारे अडथळे आणि ती परिस्थिती हाताळताना तो मुलगा काय निर्णय घेतो याची परखड कथा या लघुपटामध्ये दाखवण्यात आली आहे. या लघुपटातून दिग्दर्शक यांनी ज्या पद्धतीने विषय हाताळला आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या लघुपटाचे चित्रीकरण करमाड परिसरामध्ये असलेल्या बनगाव येथे करण्यात आले आहे.
पुरस्काराने सन्मानित
मध्य प्रदेश येथील इंदूर येथे नुकतेच कलाकारी फिल्म फेस्टिवल पार पडलं. या फेस्टिवलमध्ये प्राध्यापक राम झिंजुर्डे लिखित दिग्दर्शित काळी पन्नी या लघुपटला स्पेशल ज्युरी अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक विषय मांडणाऱ्या लघुपटाची राष्ट्रीय महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली. या लघुपटात अथांग लिंगडे, अशोक चेन्ने, संतोष दहिवळ, रोहिणी हाके, सौरभ वाघ, आदिनाथ कुबेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छाया दिग्दर्शन मुकेश ढवळे, संकलन हरी ओम जयस्वाल, संगीत चिराग मकवाना यांनी केले. सुमित डोंगरदिवे, यश पाटील, राहुल जाधव व अभिलेख कुढेकर यांनी सहाय्य केलं.
पुस्तकप्रेमींसाठी बॅड न्यूज! मराठवाड्यातील 205 ग्रंथालय 'या' कारणामुळे होणार बंद
अवॉर्ड ही कामाची एक पावती
समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात. याकडे प्रत्येक जण बघत असतो. मात्र, त्याला गांभीर्याने घेत नसतो. आमच्या अनुभवातून आम्हाला ही कथा सुचली आणि त्यावरती आम्ही काम केलं. यामध्ये सर्वच कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ म्हणून आम्हाला मिळालेल्या स्पेशल ज्युरी अवॉर्ड ही याच कामाची एक पावती आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महोत्सवामध्ये परीक्षकांना लघुपट आवडला आणि याच महोत्सवात याचा सन्मान झाला. त्याबद्दल आनंद वाटतो, असं राम झिंजुर्डे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.