सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च : राज्यामध्ये फलोत्पादनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोडदौड गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या घोडदौडीमध्ये संत्रा, काजू, मोसंबी, नारळ या फळांचा देखील समावेश आहे. मात्र या सर्व फळांचे नेतृत्व फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा करत आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा पसरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आंब्याची लागवड वाढत आहे. यंदा फेब्रुवारीपर्यंत आंबा लागवडीने 19 हजार 100 हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे फळबाग लागवडीत राज्यात आंबा क्रमांक एकवर तर संत्री क्रमांक दोनवर आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली जाते. राज्यातील फळबागा वाढाव्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी फळबागा वाढवत असून यामध्ये संत्र, मोसंबी, अंगूर, चिकू, नारळ, काजू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र यामध्ये सर्वाधिक फळबागा आंब्याच्या आहेत.
सरकारचे अनुदान
राज्यामध्ये फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आंबा हा फळांचा नेतृत्व करत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून दहा मीटर बाय दहा मीटर अंतरावर आंबा कलमानकरिता 1.67 लाख रुपये तर पाच मीटर बाय पाच मीटर अंतराकरिता 2.28 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. 2021-22 मध्ये 15 हजार 225 हेक्टरवर आंबा बाग उभ्या राहिल्या आहेत. 2021-22 मध्ये 20 हजार 822 हेक्टरवर लागवड झाली आहे. तर यावर्षी 2022-23 मध्ये फेब्रुवारी पर्यंत 19 हजार 100 हेक्टर चा टप्पा आतापर्यंत आंबा फळबागांनी पार केला आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली आहे.
राज्यातील टॉप 5 फळबाग
यावर्षी राज्यातील फळबागांमधील पाच प्रमुख फळांच्या यादीमध्ये आंब्याचा क्रमांक सर्वात पहिला येतो. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत 19 हजार 100 हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ संत्र्याचा नंबर लागतो. राज्यात 4,033 हेक्टरवर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. तर त्यानंतर काजूची लागवड 3055 हेक्टरवर करण्यात आली आहे. तसेच मोसंबी फळबागेची लागवड ही 2660 हेक्टरवर करण्यात आली आहे. नारळ या फळबागेची लागवड 1533 हेक्टरवर करण्यात आली आहे.
फसवणूक टाळा! अस्सल हापूस आंबा ओळखण्यासाठी 'ही' ट्रिक वापरा Video
अति घन लागवडीचा वापर केल्यास उत्पादन वाढ
महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा वाढत आहेत. यामध्ये आंबा हा सर्वात पुढे आहे मात्र असा असलं तरी त्याचे उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अति घन लागवडीचा वापर करावा. या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी अतिघन लागवडीचे तंत्र विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर केल्यास ते सध्याच्या उत्पादनाच्या दोन-तीन पट शिल्लकच उत्पादन घेऊ शकतात, असंही भगवानराव कापसे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.