अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 28 मार्च : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्येच कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तीन जणांना रंगेहात पकडलं आहे. तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे आणि कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम यांना 24 हजार 500 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंध पथकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी तसंच कंत्राटदार लाच घेऊन काम करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून तालुका कृषी अधिकाऱ्यासह मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी आणि कंत्राटी ऑपरेटरला लाच घेताना पकडलं.
यातला तक्रारदार हा ठिबक सिंचन साहित्याचा डीलर असून त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरवल्याबाबतच्या संचिका विजय नरवडे या मंडळ अधिकाऱ्याला सादर न करता परस्पर तपासून घेतल्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी, तसंच अनुदान प्राप्त 35 फाईल करिता प्रत्येकी 700 रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपये ची लाच मागणी केली. सागर नलावडे यांनी ही लाच स्वीकारली, तसंच बाळासाहेब निकम कृषी अधिकारी यांनी मूळ लाच मागणीशिवाय अधिकचे 1000 रुपये हे स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करून ते 1000 रूपये स्वीकारले.
यातील तालुका कृषी अधिकारी शिरीष घनाबहादुर यांनी तक्रारदार यांचेकडून अधिकचे लाच पैसे स्वीकारावे याकरिता विजय नरवडे यांना प्रोत्साहन दिले. या सगळ्या तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लालूचपत प्रतिबंधक पथकामार्फत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.