मुंबई, 13 ऑक्टोबर : छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, फारुक अब्दुल्ला यांच्यासारखे दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात भुजबळांनी शिवसेनेसोबतचा वाद आणि बाळासाहेबांसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. बाळासाहेबांवर टाकलेला अब्रुनुकसानीचा दावा कसा मागे घेतला, हेदेखील भुजबळांनी सांगितलं.
'मी बाळासाहेबांवर डिफेमेशनची केस टाकली, कारण सामनाची हेडलाईन होती, हाच तो नराधम... अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी मला साहेबांचं वय झालं आहे, असं सांगितलं, त्यामुळे मी न्यायाधिशांच्या पाया पडलो आणि केस मागे घेतली. यानंतर बाळासाहेबांनी सहकुटुंब मातोश्रीवर बोलवलं. मी गेलो आणि कधी काही झालंच नाही, असं वाटलं,' असं भुजबळ म्हणाले.
'मनोहर जोशींनी मला फोन केला आणि तुम्ही एमसीएला उभे राहत आहात, मी तुमचा फॉर्म भरला आहे, असं सांगितलं. मनोहर जोशींच्या मुलांनी अनुमोदन दिलं. पाहिलं तर विरुद्ध शरद पवार उभे होते. मी बघतो तर दोघंही गायब, इलेक्शनच्या दिवशी मनोहर जोशी थेट शरद पवारांसोबत दिसले,' असा किस्सा भुजबळांनी सांगितला.
एवढी संपत्ती कुठून आली? 75व्या वाढदिवशी पवार-ठाकरेंसमोरच भुजबळांनी सांगून टाकलं!
'मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेता केलं म्हणून मी शिवसेना सोडली, असं लिहिलं गेलं, पण मी याच्याशी सहमत नाही. पोटाला जात नसते, असं शिवसेनेचं म्हणणं होतं. पण मी आरक्षणासाठी लढत होतो, आणि शिवसेना सोडली. मी शिवसेनेचा पहिला आमदार आणि महापौर होतो,' असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं.
'शरद पवार समता परिषदेच्या मागे उभे राहिले. मी त्यांच्यासोबत गेलो. एका महिन्यात आरक्षण देणार, असं पवार म्हणाले, तसं त्यांनी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आरक्षण दिलं. एका महिन्यात त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. सरकार गेलं तरी चालेल पण आपण हे करणार, असं ते म्हणाले होते,' अशी आठवण भुजबळांनी सांगितलं.
'1991 ला जेव्हा भाजपच्या सोबत जाण्याचा विचार सुरू होता, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार मांडला होता. हे सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांनी मुस्लीम लीगच्या मंचावरून भाषणं केली होती,' असं म्हणत भुजबळांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटालाही टोला हाणला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal