10 जानेवारी : कडाक्याच्या थंडीमुळे भाज्या स्वस्त झाल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सगळीकडूनच भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्यांचे भाव बाजारात घरले आहेत. वाटाणा, सिमला मिर्ची, फ्लॉवर, गाजर, भोपळ्याचे दर कमी झालेत. त्यामुळे भाजी व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
ओला मसाल्यासाठी आवश्यक असणारी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, आले यांचे दरही 20 ते 25 टक्क्यांची घटले आहेत. राज्याच्या इतर भागांतून उत्पादन चांगले येत असल्यामुळे व या मालाला मुंबईशिवाय दुसरी कोणतीही बाजारपेठ विक्रीसाठी नसल्याने भाजीबाजारामध्ये हिरव्या भाज्या स्वस्तात मिळू लागल्या आहेत, अशी माहिती घाऊक भाजी विक्रेता संघाचे प्रशांत जगताप यांनी दिली.
घाऊक बाजारात दर पडले तरीही किरकोळ बाजारात स्वस्ताई येतेच असे नाही. मात्र, सध्या किरकोळ बाजारांमध्येही भाज्यांचे दर कमी झालेले दिसत आहेत. आणि हिच परिस्थित पुढच्या महिनाभर राहिल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे, जर थंडी अजून वाढली तर भाज्यांची आवक कमी होईल, आणि त्यामुळे पुन्हा भाज्या महागतील, अशी भीती देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.