बीड, 11 जून- जगमित्र शुगर मिलच्या नावाखाली तळणी (ता.अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांची जमीन हडपल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर खटला सुरु आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल, असे निवेदन सरकारच्या वतीने मंगळवारी खंडपीठासमोर करण्यात आले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी जमीन हडपल्याप्रकरणी सर्व आरोप फेटाळले आहेत. सरकारी जमीन हडपली हा उल्लेख चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ती जमीन 1999 पर्यंत देवस्थानची होती त्यानंतर गिरी यांनी ती विकत घेतली त्यानंतर देशमुख आणि चव्हाणांच्या नावे होती. त्यानंतर खरेदीखत झाल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
काय आहे नेमके हे प्रकरण?
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे जगमित्र शुगर मिल प्रा. लि. या नावाने साखर कारखान्याला केंद्र व राज्य सरकारची परवानगी मिळाल्याची बतावणी करून धनंजय मुंडे यांनी पुस येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लिहून घेतल्या होत्या. एवढेच नव्हे तर संबंधित शेतक-यांच्या मुलास व प्रत्येकी दोन नातेवाईकांस सदर कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. यात त्यांनी काही शेतक-यांना नाममात्र रक्कम दिली व उर्वरित रकमेचे स्टेट बँक ऑफ हैदराबादचे धनादेश दिले, जे पुढे खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने बाऊन्स झाले. सदर कारखान्यास केंद्र व राज्य सरकारची कसलीही परवानगी नसताना धनंजय मुंडे यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून सदर शेतक-यांच्या जमिनीची सात बारा वर नोंद करून घेतली. शेतक-यांना कसलाही मोबदला दिला नाही की त्यांच्या नातेवाईकांना नोक-याही दिल्या नाहीत. त्यामुळे सदर शेतक-यांनी जमिनीचा मोबदला मिळावा किंवा जमिनी परत मिळाव्यात म्हणून मुंडे यांना वारंवार विनंती केली. परंतु त्यांनी ती फेटाळून तर लावलीच पण वरून त्यांना धमक्याही दिल्या. संबंधित शेतक-यांनी याविरूद्ध सन 2012 पासून पोलिस अधिका-यांना तक्रारी दाखल केल्या, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी मुंजा किसन गिते (रा.तळणी) या शेतक-याने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर खंडपीठाच्या आदेशावरून बर्दापूर पोलिसांनी 8 सप्टेंबर 2015 रोजी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुर्यभान मुंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 420,34 अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा नोंदविल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर दबाव आणून तीन ते चार वर्षे कसल्याही प्रकारची कार्यवाही अथवा तपास करू दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले नाही, असे तक्रारदाराने याचिकेत नमुद केले आहे.
मुंजा गिते या शेतक-याला गुन्हा मागे घेण्यास धमक्या आल्यावरून त्यांनी पोलिस संरक्षण मिळावे म्हणून अॅड. मल्हारी अदाटे व अॅड. विकास कुदळे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात आरोपी विरूद्ध दोषारोप पत्र दाखल करावे आणि सदर गुन्ह्याचा तपास सीबीआय मार्फत करावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. सदर फौजदारी याचिकेस अनुसरून न्यायालयाने 26 सप्टेंबर 2018 रोजी सरकारी पक्ष व इतरांना नोटिसा काढल्या होत्या.
औरंगाबाद खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकेची सुनावणी झाली असता कोर्टाने सदर गुन्ह्याबाबत पुढे काय कार्यवाही करण्यात आली व आतापर्यंत का तपास पूर्ण झाला नाही, अशी विचारणा करत सरकारला खडे बोल सुनावले. यावर शासनाच्या वतीने अॅड. ए. आर. काळे यांनी धनंजय मुंडे व इतराविरुद्ध एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करून पुढील कारवाई करू, असे निवेदन केले. कोर्टाने सरकारी पक्षाच्या निवेदनाची नोंद घेवून फौजदारी याचिका क्रमांक 1302/2018 अन्वये याचिका कर्त्याची मागणी मान्य केली.
1) कारखान्याला लागणारी एकूण- जमीन 70 एकर (शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार)
2) 42 एकरची रजिस्ट्री झाली.(या प्रकरणात 15 ते 20 शेतकरी ज्यांना मोबदला मिळाला नाही)
3) बेलखंडी मठाची 17 एकर 34 गुंठे जमीन आहे.(पूस गावातील शेतकऱ्यांकडून विकत घेतली. मात्र शेतकऱयांकडे ती 98 वर्षांच्या करारावर देण्यात आली होती.)
4) मुंजा गीते नावाच्या शेतकऱ्याची 7 एकर 32 गुंठे- 50 लाख ठरली होती. पैकी 9 लाख रोख दिले तर उर्वरित चेक दिले होते. चेक बाऊन्स झाले.
गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया