खडसेंच्या नाराजीनंतर भाजप करणार का कारवाई? चंद्रकांत पाटलांनी दिला 'हा' इशारा

खडसेंच्या नाराजीनंतर भाजप करणार का कारवाई? चंद्रकांत पाटलांनी दिला 'हा' इशारा

'एकनाथ खडसे पक्षावर नाराज नाहीत. मात्र, कन्या रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे ते काहींवर निश्चित नाराज आहेत'

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 07 डिसेंबर :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर जळगावमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे पक्षावर नाराज नाहीत. मात्र, कन्या रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे ते काहींवर निश्चित नाराज आहेत, अशी कबुली दिली. तसंच   ही बाब पक्षश्रेष्ठींपुढे मांडली जाणार असून चुका करणाऱ्यांवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तर महाराष्ट्रातील तिढा सोडवण्यासाठी जळगावात  भाजप कोअर कमिटीच्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांची बंददाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

चुका करणाऱ्यांवर कारवाई करू- चंद्रकांत पाटील

एकनाथ खडसे पक्षावर नाराज नाहीत. मात्र, कन्या रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे ते काहींवर निश्चित नाराज आहेत. त्यांनी त्याबाबतचे म्हणणे आपल्याकडे मांडले आहे. त्यांचे म्हणणे मी शांतपणे समजून घेतले आहे. ही बाब पक्षश्रेष्ठींपुढे मांडली जाणार असून चुका करणाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला. बैठकीतील सविस्तर मुद्यांबाबत बोलण्यास त्यांनी नकार देत काढता पाय घेतला.

..तर निर्णय घ्यावा लागेल - खडसे

दरम्यान, मला भाजपच्या निर्णय प्रक्रियेसह कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. काही व्यक्तींकडून सातत्याने माझ्यावर अन्याय आणि अत्याचार करत अपमानीत केले जात आहेत. हाच प्रकार जर यापुढेही सुरू राहिला तर मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

खडसेंनी दिले पक्ष सोडण्याचे संकेत

खडसे पुढे म्हणाले, मी पक्ष सोडणार नाही, हे मी गेल्या 25 वर्षांत वेळोवेळी सांगितलं आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनात देखील नाही. जी व्यक्ती 40 ते 42 वर्षे पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी झटली आहे. ज्याने प्रतिकूल परिस्थितीत देखील पक्ष संघटन उभे केले, त्याच्या मनात पक्षाविषयी चुकीचा विचार येऊच शकत नाही. पण पक्षातील काही लोकांकडून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आज उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक असताना मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमांना देखील बोलावले जात नाही. अशा रितीने मला अपमानीत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी माझ्या राज्यभरातल्या समर्थकांना पुढे काय भूमिका घ्यायची? याबाबत विचारणा करणार आहे. घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे, याबाबतचा निर्णय मी समर्थकांच्या सांगण्यानुसार घेणार आहे, असे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे अप्रत्यक्षपणे संकेतच दिले.

'शेवटी मी पण माणूसच आहे'

काही व्यक्तींकडून मला सतत अपमानित केले जात आहे. हे कुठंवर सहन करायचे. माझी नोंदच घेतली जात नसेल तर मला कुठेतरी विचार करावा लागेल. कारण शेवटी मी पण माणूसच आहे. मी काही देव नाही. मलाही भावना आहेत. मी जो काही निर्णय घेईल तो पक्षाशी बोलूनच घेईल. वारंवार अपमानित केले जात असेल तर मात्र, मला वेगळा विचार करावाच लागेल, असे सांगत खडसेंनी भाजप पक्ष नेतृत्त्वाला निर्वाणीचा इशारा देऊन टाकला.

चंद्रकांत पाटलांसोबत 2 तास बंदद्वार चर्चा

दरम्यान, पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात एका खोलीत तब्बल 2 तास बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेवेळी खडसेंनी चंद्रकांत पाटलांना पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांचे सर्व पुरावे दिले. त्यात संबंधितांचे फोन कॉल रेकॉर्डिंग, मेसेजेस, काही सीडीज यांचा समावेश असल्याची माहिती खुद्द खडसेंनी चर्चेनंतर पत्रकारांना दिली. या साऱ्या बाबींची दखल पक्षश्रेष्ठी घेतील. हा पक्षांतर्गत शिस्तीचा भाग असल्याने तुम्ही या प्रकाराबाबत माध्यमांजवळ वाच्यता करू नका, असंही चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचं खडसे म्हणाले.

 

First published: December 7, 2019, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading