'पैशाच्या जोरावर आमदारांनी काँग्रेसला वेठीला धरलं'

'पैशाच्या जोरावर आमदारांनी काँग्रेसला वेठीला धरलं'

काँग्रेसच्याच नेत्याने आपल्याच पक्षावर पैशांचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

महेश तिवारी, चंद्रपूर 24 मार्च : चंद्रपूरच्या तिकीट वाटपावरून सुरू असलेला घोळ थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.  रविवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत चंद्रपूरचं तिकीट बाळू धानोरकरांना देण्यात आलं. या आधी हे तिकीट काँग्रेसची माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या बांगडे यांनी आपल्याच पक्षातल्या दोन आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. पैशाच्या बळावर दोन आमदारांनी पक्षालाच वेठीला धरलं असा आरोप त्यांनी केलाय.

काय म्हणाले बांगडे?

कांग्रेस पक्षातल्या दोन आमदारांनी पैशाचे राजकारण करून पक्षाला वेठीस धरण्याचे काम केले. मुद्दाम ऑडीयो क्लिप चालवून व्हायरल करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना  चाळीस वर्षापासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याऐवजी शिवसेनेतले बाळू धानोरकर जवळचे झाले आहेत. कांग्रेसचे काही धंदेवाईक आमदार  पक्षाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत.

विदर्भातल्या कांग्रेस पक्षाला वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी जे दबावाचं राजकारण सुरू केलंय त्याचा समाचार पक्ष श्रेष्ठींनी घेतला पाहिजे. पक्षातल्या नेत्यांना कांग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याबद्दल जिव्हाळा नाही. ज्यानी अजुन कांग्रेसमध्येही प्रवेश केला नाही त्यांच्याबद्दल एवढा जिव्हाळा का? असा सवालही त्यांनी केला.

चंद्रपूरात काय झालं?

उमेदवारी अर्ज भरण्याला एक दिवस राहिलेला असताना काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार दुसऱ्यांदा बदलला आहे. आज जाहीर झालेल्या नव्या यादीत शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोरकर यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून त्यांनी चंद्रपूरच्या उमेदवाराविषयी वाद असल्याची कबुली दिली होती.

भाजप आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर युतीची बाजू भक्कम झाली. भाजप सेनेचं मोठं आव्हान असताना काँग्रेसमध्ये मात्र उमेदवाराच्या नावावरून घोळ सुरू आहे. विदर्भातल्या चंद्रपूर मतदारसंघातून सुरूवातीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचं नाव यादीतही होतं मात्र वेळेवर त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडेना उमेदवारी जाहीर झाली. बांगडे हे मुकूल वासनिक यांचे समर्थक मानले जातात.

प्रदेशाध्यक्षच नाराज

चंद्रपूरबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचही मत विचारात घेण्यात आलं नाही त्यामुळे त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. चंद्रपूरसाठी अशोक चव्हाणांनी शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांना राजीनामा द्यायला लावून आपल्याकडे खेचले होते. मात्र दिल्लीतून त्यांना डावलण्यात आल्याने अशोक चव्हाणही नाराज होते.

भाजप सेनेचं तगडं आव्हान असताना काँग्रेसचा घोळ सुरू आहे त्यामुळे युतीचं आव्हान कसं पेलणार असा प्रश्न आता विचारला जातोय.  विधानसभेतले  उपनेते विजय वडेट्टीवार आणि खुद्द बाळू धानोरकर शनिवारपासून दिल्लीत दाखल झाले होते सोशल मिडीयावरूनही बाळू धानोरकर समर्थकासह विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते अखेर आज कांग्रेस पक्षाने आपला उमेदवार बदलून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या धानोरकरांना चंद्रपुरची उमेदवारी जाहीर केली.

First published: March 24, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading