चंद्रपूर, 22 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथून चार किमी अंतरावर असलेल्या शेणगाव येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. शंकर संभाजी वैद्य असं मृत्यू शेतकऱ्यांचं नाव आहे असून ते 40 वर्ष वयाचे होते.
शंकर वैद्य हे आज शेतीचे कामे आटपून शेतातून बैलगाडीने घरी जात होते. तेव्हा दुपारी चार वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि वीजा कडाडल्या. पावसातच घरी जात असताना अंगावर वीज पडल्याने शंकर वैद्य यांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबत पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून वीज कोसळून मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वीज पडून सख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्हयातील वडवणी तालुक्यातील मोरवड येथे घडली होती. बीड जिल्ह्यातील मोरवड या गावात राहणारे विष्णू अशोक अंडील(17), पूजा अशोक अंडील(15) हे दोघे भाऊ- बहिण आपल्या आई-वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेले होते.
शेतात कापूस लावण्यासाठी काम सुरू होते. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता गावात पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून बहिण आणि भाऊ एका झाडाखाली थांबले होते. काही कळायच्या आत वीज झाडावर कोसळला. यात बहिण-भावाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता.