Home /News /maharashtra /

वेदनांची अखेर! तब्बल 4 वर्ष कॅन्सरशी मोठ्या हिंमतीने लढणाऱ्या संजीवनीची झुंज अपयशी

वेदनांची अखेर! तब्बल 4 वर्ष कॅन्सरशी मोठ्या हिंमतीने लढणाऱ्या संजीवनीची झुंज अपयशी

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.

हैैदर शेख, चंद्रपूर, 24 जुलै : ब्लड कॅन्सरसारखा दुर्धर आजार असतानाही दहावी आणि नुकतीच बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणारी गुणवंत विद्यार्थीनी संजीवनी उसरेटी हिचं निधन झालं आहे. शहरातील विद्या विहार विद्यालयात ती शिक्षण घेत होती. प्रचंड वेदना सहन करत अभ्यास करणाऱ्या संजीवनीने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात 73 टक्के गुण मिळवले होते. सध्या छोट्या-मोठ्या कारणावरून जीवनाप्रती निराश होण्याच्या घटना आपल्या भवताली घडताना दिसत आहेत. मात्र संजीवनी मोठ्या हिंमतीने आपल्या आयुष्याचा लढा लढत होती. परीक्षा काळातही तिला कॅन्सर उपचारासाठी केमोथेरपी घ्यावी लागत होती. सतत रक्त बदलावे लागत असल्याने गेले वर्षभर संजीवनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नागपुरातील रुग्णालयात तिची कॅन्सरसी झुंज अपयशी ठरली आहे. दहावीच्या मध्यात असतानाच संजीवनीच्या या आजाराचे निदान झाले. मात्र तरीही उपचार घेत तिने दहावीतही 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. त्यानंतर सुरू झाला तो मानसिक दृष्ट्या खचविणारा आणि शारीरिक दृष्ट्या दुर्बल करत जाणारा ब्लड कॅन्सरचा लढा. संजीवनी शाळेत दाखल झाली खरी मात्र ती वर्गात अभावानेच बसली. तिचे पूर्ण शिक्षण एका अर्थाने ऑनलाईन झाले. वेळच तशी होती. संजीवनीला सातत्यानं केमोथेरपीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. याशिवाय सतत रक्त देखील द्यावे लागत होते. या संपूर्ण प्रक्रियेत अभ्यास बाजूला राहत असे. मात्र तरीही परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करत संजीवनीने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन करत सातत्यानं निराशेचे सूर आळविणाऱ्या युवा पिढीपुढे आदर्श ठेवला. अत्यंत वेदना देणारा आजार मात्र कुटुंबाची भरभरून मिळालेली साथ या जोरावर तिने बारावीचे रण जिंकले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी तिची प्रकृती ढासळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या