Home /News /maharashtra /

जिद्दीला सलाम! महिलेने 40 व्या वर्षी जुळ्या मुलींसह बारावीच्या परीक्षेत मिळवलं यश

जिद्दीला सलाम! महिलेने 40 व्या वर्षी जुळ्या मुलींसह बारावीच्या परीक्षेत मिळवलं यश

गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत मुलींसह कॉलेज शिक्षण पूर्ण करणाऱ्या या मातेचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.

चंद्रपूर, 20 जुलै : बारावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात एका चंद्रपूरकर (Chandrapur) मातेने आपल्या दोन जुळ्या मुलींसह बारावीच्या (12th Result) किल्ला यशस्वीपणे सर केला. वयाच्या चाळीसाव्या वर्षी गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत मुलींसह कॉलेज शिक्षण पूर्ण करणाऱ्या या मातेचे सध्या परिसरात कौतुक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या सिमेंट प्रकल्पाचे गाव असलेल्या आवारपूर येथील कल्पना मांडले या 40 महिलेनं बारावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या दोन जुळ्या मुलींसह नुकतीच बारावीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्या स्वतः दहावीत असताना कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून दिले. पती देविदास एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. दोन जुळ्या मुलींची जबाबदारी स्वीकारत आणि गृहिणी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून कल्पना मांडले यांनी याच भागात अंगणवाडी सेविकेची नोकरी देखील स्वीकारली. मात्र समाजात काम करत असताना दहावी नापास असा शिक्का पुसण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. जुळ्या मुली दहावीला जाताच त्यांनीही सोबत दहावीची परीक्षा दिली आणि यात त्यांनी 57 टक्के गुण संपादन करत पहिली पायरी पार केली. मात्र त्यांची इच्छा इथवरच थांबली नाही. बारावीतही त्यांनी जुळ्या मुलींसह कॉलेजचा उंबरठा गाठला. आपल्यासह मुलींसोबत अभ्यास करत याही गडावर त्यांनी उत्तीर्ण असा झेंडा रोवला. 58 % गुण घेत कल्पना यांनी बारावीचा गड सर केला. हा निकाल हाती पडताच त्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचं चित्र आहे. केवळ समाजात मान मिळावा म्हणून नव्हे तर शिक्षिका बनवून लहान मुलांना शिकवण्यासाठी त्यांना पुढचे उच्च शिक्षण घ्यायचे आहे. त्यांच्या जिद्दीने आसपासच्या अशा अनेक इच्छुकांना शिकण्याची-जगण्याची प्रेरणा दिली आहे. हेही वाचा - पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार का? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया दरम्यान, परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या अनेक 'कल्पना' आपल्या आसपास असतात. मात्र त्यांना त्यांच्या जिद्दीला वाट दाखवणे गरजेचे असते. कल्पना मांडले यांनी गृहिणी आणि अंगणवाडी सेविका अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत उत्तम शैक्षणिक यश संपादन केले आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: 12th result, Chandrapur

पुढील बातम्या