भाजप चाणक्यांनी पुणे जिंकलं पण कोल्हा'पुरा'त पक्षाची वाताहत!

भाजप चाणक्यांनी पुणे जिंकलं पण कोल्हा'पुरा'त पक्षाची वाताहत!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विजय मिळवला असला तरी त्यांना कोल्हापूरमध्ये पक्षाला एकही जागा जिंकून देता आली नाही.

  • Share this:

कोल्हापूर, 25 ऑक्टोबर : राज्यात पुन्हा एकदा युती सरकार येणार असलं तरी 2014 च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाला कमी जागा मिळाल्याचं मान्य केलं. यात बंडखोरांमुळे फटका बसल्याचंही ते म्हणाले. पक्षात नवीन आलेल्यांना संधी दिल्यानं काही ठिकाणी नाराजी ओढवली त्याचा परिणाम भाजपवर झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातून निवडणूक लढले. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा पराभव केला. सुरुवातीला त्यांना बाहेरचा उमेदवार नको म्हणून विरोधही झाला. तरीही चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून बाजी मारली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जागा जिंकली पण स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. पुणे जिल्ह्यात 21 पैकी 9 जागा युतीने जिंकल्या. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी त्यांच्या 6 जागा कमी झाल्या. पुण्यात यावेळी राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत 10 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या.

पुण्यातील कोथरूडमध्ये विजयी झेंडा फडकवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात मात्र पक्षाची एकही जागा जिंकता आली नाही. कोल्हापूरात आघाडीच्या उमेदवारांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला आहे. सेनेला सहापैकी एकच जागा वाचवता आली. भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेल्या आणि राज्याच्या राजकारणात वेळोवेळी आपलं वजन दाखवलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात मात्र पक्षाला एक जागा जिंकून देता आली नाही.

गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सेनेचे सहा आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यात 4 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. इतर जागांवर अपक्ष 2 तर जनसुराज्य आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका जागी विजय मिळवता आला.

वाचा : कोल्हापुरात आघाडीने उडवला भाजपचा धुव्वा, सेनेनं राखली लाज!

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याविरुद्ध पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली. कोल्हापूर उत्तरमधून सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी हरवलं. इचलकरंजी मतदारसंघात भाजपच्या सुरेश हाळवणकर यांना अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांनी 49 हजार 810 मतांनी पराभूत केलं. तर हातकणंगलेत राजू आवळे यांनी विजय मिळवला. शिरोळमधून सेनेच्याच उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांनी पराभूत केलं.

वाचा : राज्याच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं?कुणी काय गमावलं? निकालाचं समग्र चित्र

कागलमध्ये युतीला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार समरजीत घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांचा पराभव केला. चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांनी बाजी मारली. सेनेचे संग्राम कुपेकर आणि भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांचा पराभव झाला. शाहुवाडी मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर यांना पराभूत करून जनसुराज्यच्या विनय कोरे यांनी तर करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना पराभूत करून काँग्रेसच्या पीएन पाटील यांनी बाजी मारली. जिल्ह्यात सेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबीटकर यांनी विजय मिळवला.

वाचा : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 07:40 AM IST

ताज्या बातम्या