चंद्रकांत फुंदे, पुणे, 25 डिसेंबर : 'राष्ट्रवादी अजित पवार यांच्या क्लीनचिटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. युतीच्या काळात दोषी आणि निर्दोष कसे?' असा सवाल करत भाजपचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी अँटी करप्शन ब्युरोने क्लीनचिट दिली. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही क्लीनचिट दिशाभूल करणारी आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनीही याच मुद्द्यावरून अजित पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नाराज नेत्यांवर चंद्रकांत पाटलांचं भाष्य
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी जाहीर व्यासपीठावरून व्यक्त केली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. भाजपमधील नाराज नेत्यांची पक्षश्रेष्ठींनी योग्य ती दखल घेतली आहे. त्या सर्वांना पक्षात योग्य ती जबाबदारी मिळेल,' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
'ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर भाजपने वारंवार उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे,' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्रोलिंगवर बोलणं टाळलं आहे.