बंटी पाटील शिवसेनेचा प्रचार करतात? चंद्रकांत पाटलांकडून जाहीर सभेत भाष्य

बंटी पाटील शिवसेनेचा प्रचार करतात? चंद्रकांत पाटलांकडून जाहीर सभेत भाष्य

'काँग्रेसचे सतेज पाटील हे उघडपणे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार करतात'

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 22 मार्च : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये असलेल्या बिघाडीबाबत भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टिप्पणी केली आहे. 'कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक उभे असताना काँग्रेसचे बंटी उर्फ सतेज पाटील हे उघडपणे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार करतात,' असा खुलासाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शिवसेना-भाजप युतीचे कोल्हापुरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारसभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं की, 'काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी कोल्हापूरमध्ये प्रचारसभेला आल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीला मतदान करा, असं आवाहन केलं तर सतेज पाटील यांची अडचण होऊ शकते. म्हणून सतेज पाटील प्रियांका गांधी यांना कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी आणू शकत नाहीत.'

काय आहे कोल्हापुरातील राजकीय स्थिती?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या मतदारसंघात त्यांचाच खासदार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदींची मोठी लाट असतानाही ही जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला.

धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढून विजय मिळवला. पण त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मात्र महाडिक यांनी पक्षाविरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाडिक घराण्याला कोणताही पक्ष लांबचा नसतो, असं कोल्हापूरच्या राजकारणाचे निरीक्षक सांगतात.

धनंजय महाडिकांची भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत असलेल्या जवळकीच्या संबंधांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधूनही त्यांना विरोध होत असल्याचं चित्र आहे.

राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे धनंजय महाडिक यांच्यावर नाराज आहेत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा धनंजय महाडिकांवर वरदहस्त असल्याचं बोललं जातं. त्याच्या जोरावरच धनंजय यांना पुन्हा राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं आहे, असं मानलं जातं आहे.

VIDEO : प्रणिती शिंदेंची मीडियावर टीका, म्हणाल्या...

First published: March 22, 2019, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading