पुणे, 7 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होम टाऊनमध्ये शह देण्यासाठी आता भाजपने रणनीती आखली आहे. यामुळेच पुण्याच्या पालकमंत्रिपदी नेमकी कुणाची नियुक्ती होणार याबद्दल उत्सुकता होती. आता महसूल आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
'मिशन बारामती'
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं 'मिशन बारामती' होतं. इथे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला असला तरीसुद्धा चंद्रकांतदादा पाटील या निवडणुकीत बारामतीमध्ये तळ ठोकून होते. इथे त्यांचा जनसंपर्कही तगडा आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे सहकार खातं असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात ते राष्ट्रवादीला शह देऊ शकतात.
राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव होतं चर्चेत
याआधी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याच्या हालचाली भाजपनं सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे - पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आघाडीच्या प्रचाराला जाणं देखील टाळलं. तर, त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांनी कमळाला हात देत भाजपच्या तिकीटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवली. या लढतीत डॉ. सुजय विखे - पाटील यांनी विजय देखील मिळवला. त्यामुळे शरद पवारांच्या विरोधकांना पुण्याचं पालकमंत्रिपद द्यावं, असा एक सूर होता. पण आता या चर्चेवर पडदा पडला आहे.
विखे पाटलांची मंत्रिमंडळात वर्णी
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार, अशी शक्यता आहे. राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवरूनही त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचंही बोललं जात आहे.
==========================================================================================
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञा कोर्टात हजर