कोल्हापूर, 10 जून : भाजपचे नेते आणि संरक्षण राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला सर्कस म्हटल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसंच, जितेंद्र आव्हाड यांना टोलाही लगावला आहे.
शरद पवारांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या विदूषकाच्या टिकेवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात तिन्ही पक्षाचा जो कारभार सुरू आहे, त्यावर सर्कस अशी टीका केली होती. व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण शरद पवार हे खूप मोठे नेते आहे. त्यांच्यावर कायम टीका करण्यासाठी मी इतका मोठा नाही. परंतु, शरद पवार यांनीच मान्य केली की त्यांच्याकडे सर्कस आहे. सर्कस आहे, प्राणी आहे आणि विदूषक नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सर्कस असल्याचं हे त्यांनीच मान्य केलं आहे. हे मी नाही बोललो ते शरद पवार बोलले' अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
हेही वाचा-आमचा मुख्यमंत्री अजून झाला नाही पण..,राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे सूचक विधान
तसंच, मी पुन्हा टीका केल्यामुळे आता जितेंद्र आव्हाड म्हणतील की, चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर बोलू नये. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्या मनात जो आदर आहे, तो आव्हाड यांच्यामध्येही नसेल आणि हे शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे, अशी टोलाही पाटलांनी आव्हाडांना लगावला.
त्याचबरोबर, 'शेवटी हे राजकारण आहे. इथं एकाने बॉल मारला की, दुसरा त्याला टोलावतो. त्यामुळे हे फार लक्षात ठेवण्यासारखे काही नाही. राजनाथ सिंह यांनी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले होते, ते त्यांना मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे' असं म्हणून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही पाटलांनी केला.
काय म्हणाले होते आव्हाड?
'आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. जणू काही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं होतं.
हेही वाचा -मोठी बातमी! शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार
1972 साली दुष्काळ पडला तेव्हा गावागावात पोहचले शरद पवार... 1993 चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार साहेब जागेवर पोहचले. किल्लारीचा भूकंप झाला... तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना कळण्याच्या आत पवार साहेब किल्लारीला पोहचले, शरद पवार यांच्या या जनसेवेची जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना आठवण करून दिली.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.