विवेक कुलकर्णी, मुंबई 13 जून : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झालीय. भाजपमध्ये एक नेत एक पद हे धोरण असल्याने राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या नावांवर विचार सुरू आहे. या सर्वात आघाडीवर आहेत ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा विश्वास यामुळे दादांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी चर्चा आहे.
जातीय समिकरणांचा विचार करता प्रदेशाध्यक्षपदी मराठा नेत्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. पाटील यांचं राज्याच्या मंत्रिमंडळातही नंबर दोनचं स्थान आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुका बघता त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र महत्वाची खाती आणि शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण सारख्या महत्वाच्या उपसमित्यांचं अध्यक्षपद सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास चंद्रकांत पाटील फारसे अनुकूल नाहीत असंही बोललं जातंय.
यामुळे पक्षश्रेष्टींकडून विचारणा झाली असली तरी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे.
विधानसभेतल्या जागावाटपावरून आघाडीत 'बिघाडी'
विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने शिल्लक आहेत. युतीचं जागावाटप पूर्णही झालंय. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. या चर्चेत मुंबईतल्या जागांववरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाल्याची माहिती पुढे येतेय. मुंबईतलं जागावाटप समसमान पातळीवर व्हावं असं राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा असा सवाल काँग्रेसने केलाय.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही दोन्ही पक्ष काहीच धडा शिकले नाहीत असंच म्हटलं जातंय. भाजप आणि सेनेसारख्या मजबूत पक्षांशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येवून लढू अशी घोषणा दोन्ही पक्षांनी केला. मात्र जागावाटपाच्या चर्चेत घोळ घातला जातोय अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तक्रार आहे. या चर्चेत वेळ जातो आणि मग तयारीसाठी जास्त दिवस मिळत नाही असं या नेत्यांचं म्हणणं आहे.
या चर्चेवर काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह म्हणाले, एनसीपीने काय प्रस्ताव नेमका मांडला हे माहित नाही, काँग्रेस पक्षांची मुंबई क्षेत्रातील विधानसभा आढावा बैठक शुक्रवारी आहे. त्यावेळी चर्चा करू, काँग्रेस पक्षश्रेष्ठी या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतील. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत 37 पैकी 7 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला दिल्या होत्या.
अंतिम जागा वाटप एनसीपी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी करतील असं म्हटलं जात असलं तरी राष्ट्रवादीला अर्ध्या जागा द्यायला मात्र काँग्रेसची सकारात्मक भूमिका नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय.