2 पाटलांच्या भेटीने खळबळ.. चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा

2 पाटलांच्या भेटीने खळबळ.. चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. विशेष म्हणजे उभय नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटे बंदद्वार चर्चा झाली.

  • Share this:

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)

कोल्हापूर, 3 ऑगस्ट- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. विशेष म्हणजे उभय नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली. एकमेकांचे विरोधक असलेल्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भेटल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये शनिवारी एक दुर्मिळ राजकीय योगायोग पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि त्याच वातावरणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचं. पत्रकार संघाचे विभागीय कार्यालय कोल्हापूर मध्ये सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या  निमित्ताने जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर या माझ्या शुभेच्छा व्यक्तिगत असून मी जातीवादाला थारा देत नाही, असं म्हटलंय आणि त्यांचं भाषण सुरू असताना स्टेजवरील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ते पण पाटीलच आहेत, असे म्हटल्यावर आडनावात काय आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटलांकडे जाणार मुख्यमंत्रिपद?

विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरले असून महाजनादेश यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र, त्याचवेळी आगामी निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाईल, या चर्चेने जोर धरला आहे. याबाबतच्या चर्चांना आता स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

'चंद्रकांतदादा काय बोलले आहेत याबद्दल माझे त्यांच्याशी काही बोलणे झाले नाही. आमच्या पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्त्व मुख्यमंत्री ठरवतात. सध्यातरी मी मुख्यमंत्री आहे. तुमची कृपा आणि आशीर्वाद असतील तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यांना स्थैर्य मिळू द्या,' असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी बसण्यास सज्ज असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवले आहे.

मुख्यमंत्रिपदाबद्दल काय म्हणाले होते चंद्रकांतदादा?

गेल्या काही दिवसांमध्ये चंद्रकांत पाटील यांचे भाजपमध्ये 'वजन' वाढले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नंबर 2 चे नेते, अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर 'मला मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा नाही,' असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले होते.

'संघटना सांगेल ती जबाबदारी मी स्वीकारतो. संघटनेने सांगितल्यानंतर मी बांधकाममंत्री झालो, महसूलमंत्री झालो आता प्रदेशाध्यक्ष झालो. मला मुख्यमंत्रिपदाची शून्य महत्त्वाकांक्षा आहे,' असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.

VIDEO:EXCLUSIVE डे विथ लीडर-भावी मुख्यमंत्री सेनेचा? पाहा काय आहे आदित्य ठाकरेंच्या मनात

Published by: Sandip Parolekar
First published: August 3, 2019, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading