धुळे, 26 मार्च : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवत असणाऱ्या पोलिसालाच चिरडण्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११वर चाळीसगाव नजीक महामार्ग पोलीस चौकी समोर घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी अनिल शिसोदे यांचा जागीच मृत्यू झाला.
अनिल शालिग्राम शिसोदे (वय ५२) मुळ राहणार डांगरी ता. अमळनेर हे गेल्या तीन वर्षांपासून चाळीसगाव वाहतूक शाखेत कार्यरत होते. सोमवारी ते महामार्ग पोलीस चौकी समोर कर्तव्य बजावत असताना धुळे येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, ट्रक चालकाने त्यांना उडवले.
ही घटना चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला चार किमी अंतरावर असणाऱ्या महामार्ग पोलीस चौकी समोरच घडली. यानंतर ट्रकला काही अंतरावर पाठलाग करुन पकडण्यात आले. चालक मात्र पसार झाला. यावेळी आणखी पाच पोलीस कर्मचारीही तिथे होते. अनिल शिसोदे हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई - वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.