भुजबळांचा पुन्हा चकवा, शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या बैठकीला

भुजबळांचा पुन्हा चकवा, शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या बैठकीला

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पुणे, 6 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. छगन भुजबळ यांच्या प्रवेशावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं. स्थानिक कार्यकर्त्यांनी भुजबळांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी केली, तर नेते मात्र विरोधाचा सूर आळवत राहिले. मात्र आता छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.

भुजबळ येवल्यातूनच लढणार

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षात अर्थात शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला. ही चर्चा सुरू असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मोठी घोषणा केली.

छगन भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून येवला मतदारसंघात तळ ठोकून होते. यंदाच्या निवडणुकीत छगन भुजबळ आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदासंघातून लढतील, असं बोललं जात होतं. अशातच आता छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत मी येवला मतदारसंघातूनच लढणार असल्याची मोठी घोषणा केली. भुजबळांच्या या घोषणेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

छगन भुजबळ यांनी मंगळवारी येवल्यात विविध विकासकामांची उद्घाटने केली. तर बुधवारी सायंकाळी त्यांनी मतदारसंघातील गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिक आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 'कोण आला रे कोण आला' अशा घोषणा देत त्यांच्या खांद्यावर भगवी शाल टाकून त्यांचे जोरदार स्वागत केले.

SPECIAL REPORT : मित्रपक्षांसाठी काँग्रेस उदार, राष्ट्रवादीचं विधानसभेतही वर्चस्व!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 10:02 AM IST

ताज्या बातम्या