मुंबई, 13 ऑक्टोबर : छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलावलं होतं, पण ते आले नाहीत, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात भुजबळांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवरही उत्तर दिलं.
लोक म्हणतात एवढी संपत्ती कशी, पण आम्ही दोन भावांनी खूप मेहनत घेतली. सकाळी 3 वाजता भाजी घ्यायला मार्केटमध्ये जायचो. ती भाजी माझगावच्या घरासमोरच्या फुटपाथवर विकायची. नंतर मोठ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि ट्रकभर भाजी पाठवायचो. लोक एवढी संपत्ती कुठून आली विचारतात, पण आम्ही लहानपणापासून मेहनत घेतली, असं भुजबळ म्हणाले.
'माथाड्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यात दोन पैसे मिळाले. एक कंपनी बंद पडली होती, तेव्हा कामगारांनी मलाच कंपनी चालवा आणि पगार द्या असं सांगितलं. अख्ख्या बीएसटीचे टायर माझ्याकडे रिमोल्डिंगला यायचे. रबरची दुसरी कंपनी पनवेलला घेतली. मुंबई-गोवा पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स छगन भुजबळने सुरू केली. सिनेमे काढले, अनेक उद्योग सुरू होते,' असं भुजबळांनी सांगितलं.
'भुजबळ आज शिवसेनेत असते तर...', पवारांसमोरच ठाकरे नेमकं काय बोलून गेले?
'माझं नाव तेलगी स्टॅम्प केसमध्ये घेतलं गेलं. मोका लावला, क्लीन चिट दिली, पण जे नुकसान व्हायचं ते झालं. उपमुख्यमंत्रीपद गेलं, मंत्रिपदही गेलं. साहेब म्हणाले निवडणूक लढणार का? हो म्हटलो,' असा किस्सा भुजबळांनी सांगितला.
'बोट क्लब केला होता, अमेरिकेतून 50 बोटी आणल्या होत्या, पण सरकार गेलं त्यातल्या 10-12 बोटी गायब झाल्या. कॉन्ट्रॅक्ट 100 कोटींचं यांनी आरोप केला 25 हजार कोटी खाल्ले. म्हैस केवढी तिला एवढं मोठं रेडकू होणार का?,' असा सवाल भुजबळांनी विचारला.
महाराष्ट्र सदन किती सुंदर, महाराष्ट्र सदन सुंदर है... बनानेवाला अंदर है... अशी गत होती. अडीच वर्ष आत राहिलेल्या माणसाला शरद पवार साहेबांनी शिवाजी पार्कात उभं केलं आणि मंत्रीपदाची शपथ दिली, एवढं कोण करतं. मला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते लाभले. माझ्या इतका भाग्यवान कोणताच राजकारणी नाही. अडचणीत लोकांना साथ कशी द्यायची, हे मी यांच्याकडून शिकलो, असं वक्तव्य भुजबळांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal