अंबरनाथ, 26 जानेवारी : काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील सर्वोदय नगर भागातील भवानी ज्वेलर्समध्ये भर दुपारी चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. यात ज्वेलर्स मालकासह तिघावर गोळीबार करत चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी आता तिघा तरुणांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या टोळीचा मास्टरमाईंड आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.
अंबरनाथमधील सर्वोदय नगर परिसराततील भवानी ज्वेलर्सच्या दुकानात चार जणांनी दरोडा घालत प्रतिकार करणाऱ्या तिघावर गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याची घटना 10 जानेवारी रोजी भर दिवसा घडली होती. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच दहशतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला.
हेही वाचा - पत्त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार, भीषण हल्ल्याचा LIVE VIDEO
हे चौघे सीसीटीव्हीत कैद झाले होते, मात्र तोंडावर मास्क असल्याने आरोपीपर्यंत पोहचण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर होते. भरदिवसा दहशत माजवणाऱ्या या आरोपींना गजाआड करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी चार पथके नेमली. तर गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत होती. अखेर 15 दिवसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मोनू विश्वकर्मा, धीरज सर्वगोडे, दिवेश सिंग अशी तीन अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी 5 तोळे सोने हस्तगत केलं असून या टोळीचा मास्टरमाईंडसह त्याचा साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Robbery Case