Home /News /maharashtra /

पवनची बर्थ डे पार्टी केली अन् काही मिनिटांत मृत्यूने गाठले, वर्ध्याच्या 7 विद्यार्थ्यांचा अपघाताआधीचा VIDEO आला समोर

पवनची बर्थ डे पार्टी केली अन् काही मिनिटांत मृत्यूने गाठले, वर्ध्याच्या 7 विद्यार्थ्यांचा अपघाताआधीचा VIDEO आला समोर

हा अपघात इतका भीषण होता की, नदीवरुन पुल तोडून गाडी खाली कोसळली. जवळपास 40 फूट पुलावरून ही कार खाली कोसळली होती.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा 26 जानेवारी : वर्ध्या जिल्ह्यातील सेलसुरा इथं झालेल्या भीषण अपघातात (Wardha Accident) 7 भावी डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं होतं. या अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये ही सातही भावी डॉक्टर जेवणासाठी आले होते. त्यानंतर इथून निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांना मृत्यूने गाठले. वर्ध्यातील सेलसुरा इथं 24 जानेवारी रोजी महिंद्रा एसयुव्ही 500 चा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आमदार विजयभाऊ रहांगडाले (Vijay Rahangdale's Son) तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार रहांगडाले (Avishkar Rahangdale Accident) यांच्यासह 7 मित्रांचा मृत्यू झाला होता. पण, अपघातापूर्वी हे सातही मित्र कुठे गेले होते, त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण, अपघातापूर्वीच हे सातही मित्र एका हॉटेलवर गेले होते. अपघातात मृत पावलेल्या पवन शक्ती याचा वाढदिवस होता.  वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जेवणासाठी गेले होते. नागपूर तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे पोहोचले होते. तेथील सीसीटीव्हीमध्ये कार स्पष्टपणे दिसून आली आहे. हॉटेलमध्ये पवनच्या वाढदिवसाचा केक कापला आणि जेवण केलं. त्यानंतर सर्व जण घरी परत येत होते. पण काही अंतरावर जात नाही, तेच या कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, नदीवरुन पुल तोडून गाडी खाली कोसळली. जवळपास 40 फूट पुलावरून ही कार खाली कोसळली होती. सर्व मृतक विद्यार्थी हे 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात नीरज चव्हाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, शुभम जैसवाल, पवन शक्ती यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हे सर्व विद्यार्थी नेमके गेले कुठे होते याबाबत चर्चा सुरू होती. मात्र या सीसीटीव्हीनंतर हे सर्व यवतमाळ जिल्ह्यात नसून वर्धा जिल्ह्यातच गेले असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन झाले असून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहे. या घटनेमुळे वर्ध्यात हळहळ व्यक्त केली जात होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या