Home /News /maharashtra /

गावकऱ्यांच्या जीवाशी भयंकर खेळ, गावकऱ्यांनी टँकर पकडून चालकाला चोपले, VIDEO

गावकऱ्यांच्या जीवाशी भयंकर खेळ, गावकऱ्यांनी टँकर पकडून चालकाला चोपले, VIDEO

'गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गालगत ओढे आणि नाल्यांमध्ये कोणीतरी अज्ञात टँकर चालक रासायनिक कंपन्यांमधून आलेले घातक रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे प्रकार घडत आहेत.

    चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड, 23 नोव्हेंबर : प्रदूषणाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या लोटे एमआयडीसीमधील (Lote MIDC) रासायनिक कारखान्यांमधून येणारे घातक रासायनिक सांडपाणी रात्रीच्या अंधारात उघड्यावर सोडणाऱ्या दोन टँकर (Tanker) चालकांना स्थानिक ग्रामस्थांनी भल्या पहाटे पकडून चांगलाच चोप दिला. एवढंच नाही तर संतापलेल्या ग्रामस्थांनी टँकरची तोडफोड सुद्धा केली. लवेल आणि असगणी परिसरात आज पहाटे संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित दोन्ही टँकर चालकांना ग्रामस्थांनी खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. लोटे एमआयडीसीमधील दोन कंपन्यांमधून गेल्या दीड वर्षांपासून हा भयानक प्रकार सुरू असून या आधी अनेकवेळा घातक रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गालगत ओढे आणि नाल्यांमध्ये कोणीतरी अज्ञात टँकर चालक रासायनिक कंपन्यांमधून आलेले घातक रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे प्रकार घडत आहेत. लोटे परिसरात तसंच महामार्गावर कशेडी घाटात असे प्रकार वारंवार घडले असून याबाबत खेड पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, हा भयानक प्रकार नेमकं कोण करत आहे. या बाबत कोणालाही माहिती मिळत नव्हती. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास हा प्रकार होत होता. गेल्या आठवड्यापासून मुंबई गोवा महामार्गालगत लवेल आणि असगणी गावानजीक ओढ्यामध्ये अशाच प्रकारे केमिकल ओतण्याचा प्रकार घडला होता. ओढ्याचे पाणी पुढे नदीला मिळते आणि नदीकाठी पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजना असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले होते. गेल्या आठवड्यापासून सतत हा प्रकार होत असल्याने , काही जागरूक नागरिकांनी रात्रीच्यावेळी गस्त घातली आणि आज सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास ओढ्यानजीक टँकर उभा राहिलेला दिसला जवळ जाऊन पहिले असता टँकर मधून रासायनिक सांडपाणी थेट ओढ्यात सोडले होते, हा प्रकार रंगेहाथ पकडून ग्रामस्थांनी फोनवरून गावातील लोकांना बोलावले. एक टँकर सोडून रिकामा केला होता. तर दुसरा सोडण्याच्या तयारीत होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संतापाच्या भरात दगड फेक करत टँकरच्या काचा आणि हेडलाईट फोडून टाकल्या संबंधित टँकर चालक पळून लोटे येथील एका ठिकाणी लपून बसले होते. खेडमधून शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, घाणेखुंटचे अंकुश काते, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, यांसह 50 ते 60 कार्यकर्ते पटवर्धन लोटे या ठिकाणी जमा झाले. लपून बसलेल्या दोन्ही टँकरचालकांना शोधून आणले त्याठिकाणी देखील त्यांना चांगलाच प्रसाद मिळाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर सीईटीपीचे अधिकारी चव्हाण यांच्या मार्फत या टँकर चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी लोटे येथे मोठी गर्दी झाली होती.  कशेडीत घडलेला प्रकार देखील उघड गेल्या महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका वळणावर अशाच प्रकारे वाहत्या ओढ्यामध्ये केमिकल सोडण्यात आले होते. या ओढ्यालगत नळपाणी योजनांचे पाणी देखील खराब झाले होते. नदीतील मासे आणि जलचर मरून गेले होते. या प्रकरणी तेथील ग्रामस्थांनी आंदोलन देखील केले. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला होता. आता यावर एमपीसीबी आणि पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या