मुंबई, 2 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात असंख्य लोकवस्त्या आहेत. या वस्त्यांना जातींवरून नावं देण्यात आलेली आहेत. मात्र, आता अशा वस्त्यांना असलेली जातींची नावं हद्दपार होणार आहेत.
सामाजिक न्याय विभागानं यासंदर्भात तयार केलेल्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा..BHR घोटाळ्याची चौकशी भाजप सरकारच्या आदेशानुसारच, खडसेंनी दरेकरांना सुनावलं
राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील. यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.
राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये 'दलित' शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत 'Scheduled Caste & Nav Bouddha' आणि मराठी भाषेत 'अनुसूचित जाती व नव बौद्ध' या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
महापुरुषांची नावं देणार...
शहरातील विविध जातीवाचक वस्त्यांची नावं हद्दपार करून त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार आहेत. वस्त्यांना दिलेली जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या मताचा विचार करून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार त्या संबंधीचा प्रस्ताव विभागानं तयार केला आहे. जातीवाचक नावांमुळे त्या वस्त्या विशिष्ट समाजाच्या असल्याचं निदर्शनास येते. आता मात्र, या वस्त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे.
हेही वाचा...मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा मृत्यू
याबाबत नगरविकास आणि ग्रामविकास विभागातर्फे त्यासाठीचा मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात येणार आहे. राजकारणात जातीच वापर करण्यासाठी नेत्यांचीच या जाती ठळक करून ठेवल्याचा आरोप देखील होत आहे. असं असताना राज्यातील राज्यकर्त्यांनीच ही रेषा आता पुसण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.