राज्यात एका जागेवर भाजपचा उमेदवार बदलणार ?

राज्यात एका जागेवर भाजपचा उमेदवार बदलणार ?

लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ आलं तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिलं आहे.

  • Share this:

प्रशांत बाग

लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ आलं तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिलं आहे.

जळगावमध्ये उमेदवार बदलणार ?

जळगाव ही भाजपची हमखास निवडून येणारी जागा आहे, असं बोललं जातं. इथे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचं तिकीट कापून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे पण त्यांच्या उमेदवारीमध्ये बदल होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

स्मिता वाघ यांच्या जागी आमदार उन्मेष पाटील आणि प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याबद्दल भाजपचा विचार सुरू आहे. उन्मेष पाटील हे चाळीसगावचे विद्यमान आमदार आहेत तर प्रकाश पाटील हे जळगावकर आहेत.या तिघांपैकी नेमकी कुणाची उमेदवारी अंतिम होणार याचा निर्णय येत्या २ दिवसात होऊ शकतो.

नंदुरबारमध्ये आव्हान

नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना निष्ठावंतांनी आव्हान दिलं आहे. सुहास नटावदकर हे भाजपचे कडवे निष्ठावंत आहेत. ते यावेळी लोकसभेसाठी इच्छुक होते. म्हणूनच पक्षानं आपल्याला डावललं, अशी खंत त्यांना आहे. नटावदकर यांच्यासारख्या नेत्यांची नाराजी डॉ. हीना गावित यांना भोवू शकते.

दिंडोरीमध्येही बंडखोरी ?

दिंडोरीमध्ये भाजपचे नाराज खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपने त्यांचं तिकीट कापल्याने नाराज आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉक्टर भारती पवार यांना भाजपने तिकीट दिलं. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षाला आव्हान दिलं आहे. सीपीएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या संपर्कात आहेत,असा दावा हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही पण त्यांनी आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवली आहे.

या सगळ्या नाराज आणि निष्ठावंतांचं बंड थंड कसं करणार याबद्दल गिरीश महाजन यांची कसोटी लागणार आहे. उत्तर महाराष्ट्र हा युतीचा बालेकिल्ला मानला जातो. इथे ८ पैकी ६ भाजपकडे आहेत तर शिवसेनेकडे २ जागा आहेत.

===========================================================================================================================================================

VIDEO: मोदींच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर पाहाच

First published: April 3, 2019, 5:33 PM IST

ताज्या बातम्या