नांदेड, 18 जानेवारी : कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली पण भष्ट्राचाराचे आरोप फक्त छगन भुजबळ यांच्यावर लावल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी केली. मलाई, दूध, दही सर्वांनी खाल्लं तुरुंगात फक्त छगन भुजबळ गेले. तेव्हा साहेबांच्या पुतण्याने अर्थात अजित पवार यांनी काहीच खाल्लं नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
नांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत भारीप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि संघावर सडकून टीका केली.
'काँग्रेस-राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत', असं एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. 'प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं हव्या तितक्या जागा द्याव्यात, आपण एकही जागा लढवणार', नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
'अमेठीत भडकावू भाषण देईन'
'आंबेडकर यांच्या अटी मान्य करा आघाडी करा, मी स्वतंत्र सभा घेऊन स्वागत करतो', असंही ते म्हणाले.'तेलंगणा विधानसभेच्या वेळेस राहुल गांधींनी हैदराबादला येऊन आम्हाला आव्हान दिलं होतं. आता मी अमेठीला जाऊन भडकावू भाषण देणार', असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
'भ्रष्टाचार फक्त छगन भुजबळ यांनीच केला होता का? साहेबांच्या (शरद पवारांच्या) पुतण्याने काहीच खाल्लं नाही का? असा सवाल करत 'छगन भुजबळ यांना दोन वर्ष तुरुंगात ठेवणे हा अन्याय होता, आता त्यांनाही समजलं असेल', असंही ओवैसी म्हणाले.
आंबेडकरांचं संघाला आव्हान
'संघाच्या घरात धाडी मारण्याचे धैर्य पोलिसांनी दाखवले आणि डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून शस्त्रसाठा पकडणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन करतो. आता पोलिसांनी नागपूर येथील रेशीमबागमध्ये धाड मारावी, तिथे एके 47 सापडतील', अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली.
'सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालण्यास मी तयार आहे. मोहन भागवत यांनी वेळ आणि तारीख ठरवावी आणि मला बोलवावं' असं आव्हानच आंबेडकर यांनी भागवतांना दिलं आहे.
=========================