Crime in Satara: साताऱ्यात एका युवकानं भलत्याच कारणातून बैलाची हत्या केली आहे. आरोपीनं शर्यतीच्या बैलाला निर्जनस्थळी नेऊन झाडाला बांधून त्याच्या नरड्यावरून सुरा फिरवला आहे.
सातारा, 12 जुलै: सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सरताळे याठिकाणी एका युवकानं एका भलत्याच कारणातून आपल्या बैलाची हत्या केली आहे. आरोपीनं शर्यतीच्या बैलाला निर्जनस्थळी नेऊन झाडाला बांधून त्याच्या नरड्यावरून सुरा फिरवला आहे. शर्यतीसाठी विकत घेतलेला बैल एका रस्ते अपघातात (Road accident) जखमी (Bull Injured) झाला. यामुळे जखमी झालेल्या बैलाचा सांभाळ कसा करायचा, या कारणावरून निर्दयी तरुणानं मुक्या जिवाला निर्जनस्थळी नेऊन क्रूरपणे हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
कुमार प्रकाश पडवळ असं अटक केलेल्या 28 वर्षीय आरोपीचं नाव असून तो वाई तालुक्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी आहे. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील बैल बाजारातून एक शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा बैल घरी घेऊन जाताना, एका वाहनानं या बैलाला धडक मारली. यामध्ये हा बैल जखमी झाला. यामुळे या जखमी बैलाचा सांभाळ कसा करायचा या कारणातून संबंधित तरुणानं बैलाला जावळी तालुक्यातील सरताळे येथील निर्जनस्थळी नेले.
हेही वाचा-पुण्यातील दत्तवाडी परिसरात कुख्यात गुंडाची हत्या, कोयत्याने सपासप वार करुन ठार
परिसरात कोणी पाहात नसल्याची पुष्टी केल्यानंतर संशयित आरोपीनं निष्पाप बैलाला एका झाडाला बांधलं आणि त्याच्या नरड्यावरून सुरा फिरवला. दुसऱ्या क्षणात हा बैल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पिकअप घेऊन पळ काढला. ही घटना उघडकीस येताच मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास केल्यानंतर सहा दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा-लोखंडी पाइपनं डोक्यात अन् मानेवर सपासप वार; मुलानं जन्मदात्या बापाला संपवलं
याप्रकरणी पोलिसांनी बैलाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडीही जप्त केली आहे. बैल केवळ रस्ते अपघातात जखमी झाला म्हणून तरुणानं या बैलाची हत्या केली आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.