मुंबई, 07 डिसेंबर : मागच्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू आहे. बेळगावसह 940 गावांचा प्रश्नावर दोन्ही राज्यांमध्ये नेहमी वाद उफाळून येत असतो. दरम्यान हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची 40 गावे कर्नाटकात विलीन होणार असल्याचा पहिल्यांदा मुद्दा चर्चेत आला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्यासाठी निदर्शने केली. आता बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे.
मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन निर्णय घेतला असून यासंदर्भातील निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान यापूर्वी तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील गावकऱ्यांनी अशीच मागणी केली होती. यावरून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला होता.
हे ही वाचा : महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचा धिक्कार असो म्हणत… ठाकरे गटाकडून कर्नाटक बस रोखल्या
सांगली जिल्हाच्या जत तालुक्यातील 40 गावांना पाणी आणि मुलभूत सुविधा मिळत नसल्याने कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय आता बुलढाणा जिल्ह्यातील जामोदमधील गावकऱ्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निषेध करत बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवरील चार गावांनी मध्य प्रदेशात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक निवेदन त्यांनी काल (दि. 06) उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील भिंगारा 40 टपरी गोमाल एक आणि गोमाल दोन अशा चार गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि जळगाव जामोद तालुका प्रशासन पुरवण्यास असमर्थ असल्याने आम्हाला मध्य प्रदेशात सामील करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
यामुळे बुलढाणा जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत माध्यमांमध्ये चर्चा झाल्याचे समजताच बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्या गावांना भेटी दिल्या.
हे ही वाचा : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, सीमावादाच्या मुद्द्यावरुन शिवसेना सरकारला कोंडीत पकडणार?
मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम गावांकडे जिल्हा प्रशासन खरंच दुर्लक्ष करत असल्याचे माध्यामांद्वारे वास्तव समोर आले आहे. या भागात जाण्यासाठी लोकांना चालण्यासाठी नीट रस्ताच नसल्याचे एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्रशासनाचे अधिकारी तात्काळ पाहणी करण्यासाठी या भागांत रवाना झाल्याची माहिती आहे. मात्र अशा सीमा भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं दिवसेंदिवस अशी सीमांवरील गावं ही शेजारच्या राज्यात सामील होण्याच्या घटना समोर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news, Cm eknath shinde, Madhya pradesh