राहुल खंदारे,प्रतिनिधी
बुलडाणा, 23 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात खामगावमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. खासगी कोविड सेंटरनं (Private covid center) पतीच्या कोरोना उपचाराच्या बिलासाठी महिलेचं मंगळसूत्र (covid center took Mangalsutra) ठेवून घेतलं. विशेष म्हणजे, हा रुग्ण कोरोनाबाधित नसताना MRI च्या रिपोर्टवरुन 9 दिवस कोरोनाचे उपचार केले, असा आरोप करण्यात आला आहे. अत्यंत हलाखीची परिस्थितीची असलेल्या गवई कुटुंबाला बिल भरायला 11 हजार रुपये कमी पडले. त्यावर कोविड सेंटरनं रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन घेतले. त्यानंतरच रुग्णाला सुटी दिली. खामगाव येथील अश्विनी कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
(वाचा-कोरोना लस घेतलेल्या तरुणांमध्ये जाणवली ही गंभीर समस्या, CDC नं दिला इशारा)
कोरोना आणि लॉकडाउनने त्रस्त असलेल्या नागरिकांवर खासगी कोविड सेंटरही अत्याचार करतायत. खामगाव येथील चार ते पाच डॉक्टरांनी हे रुग्णालय भाड्यानं कोविड सेंटर सुरू केलं. 13 तारखेला दुर्गम भागातील आवार गावातील मंगेश गवई नावाचा तरुण सर्दी, ताप या आजारासाठी डॉ. पंकज मंत्री यांच्याकडे गेला. डॉ. मंत्री या कोविड सेंटर चालकांपैकी एक आहेत. डॉ.मंत्री यांनी त्याला छातीचा MRI करायला सांगितलं. सोबत पैसे नसल्यानं रुग्ण परत गावी गेला.
अटाळी आरोग्य केंद्रात त्यानं कोविड टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आपण कोरोनाबाधित नसल्याची त्याला खात्री झाली. पण ताप येत असल्यानं त्यानं MRI करून घेतली. तेव्हा डॉ.मंत्री यांनी रिपोर्ट पाहून RTPCR टेस्ट न करता तुम्हाला कोरोनाची लक्षणं आहेत असं सांगितलं. तसंच आमच्या कोविड सेन्टरला भरती व्हा असा सल्ला दिला. रुग्णाने घरात असलेली 45 हजारात घेतलेली बैलजोडी 38 हजारांत विकली आणि पैशाची जुळवाजुळव करून तो दाखल झाला.
(वाचा-मृत्यूनंतरही अवहेलनाच! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाला लागल्या मुंग्या)
नऊ दिवसांत्या उपचारानंतर कोविड सेंटरनं या रुग्णाचं बिल 81 हजार रुपये दाखवलं. रुग्णाने 70 हजार रुपये जमा केले. तसंच 11 हजार रुपये घरी गेल्यावर पुन्हा आणून देतो असं सांगितलं. मात्र रुग्णालयानं सुटी देण्यास नकार दिला. रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन द्या आणि पैसे आणून द्या, असं सांगितलं. त्यावर नाइलाजाने नातेवाईकांनी रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र काढून दिलं, त्यानंतर रुग्णालयानं रुग्णाला सुटी दिली. हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे समाज माध्यमातून वायरल झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागं झालं. तडकाफडकी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
रुग्णालय प्रशासनानं काही झालंच नाही असा आव आणून आम्हाला या वायरल व्हिडीओ बाबत काहीच माहीत नसल्याचं म्हटलंय. रुग्ण कोरोनाबाधित नसताना कोविड सेन्टर मध्ये उपचार करण्याबाबत विचारलं असता तो पॉझिटिव्ह होता असं सांगितलं. मात्र त्याची RTPCR टेस्ट कधीही केली नाही. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात असे प्रकार घडत आहेत. अशाप्रकारे माणुसकी नसणाऱ्या कोविड सेंटररवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Coronavirus