बुलडाणा, 6 जून : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोळा येथील ग्रामस्थ गेल्या काही तासांपासून बिबट्या सोबत झुंज देत होते. यामध्ये 4 लोक जखमी देखील झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. वन विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत यांना सांगून सुद्धा याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.
मेहकर तालुक्यामधील ग्राम मोळा गावालगतच्या नाल्यांमध्ये गावकऱ्यांना दर्शन होतास गावांमध्ये येऊ नये यासाठी गावातील लोकांनी त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला. मात्र यावेळी मधुकर वानखेडे यांच्या कानाला व दंडाला, दत्ता वानखेडे पाठीवर व तोंडावर,प्रफुल वानखेडे यांच्या पाठी मागील भागात आणि निखील धोटे यांच्या डोक्यावर दाताने व नखाने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. उपस्थित जनसमूहाच्या कल्लोळाने त्यांचे प्राण वाचले. बिबट्याने लावणा शिवाराकडे पळ काढला.
सदर नालामध्ये गावातील महिला व पुरुष स्वच्छालयाला जात असताना संध्याकाळच्या सहा वाजता लोकांच्या समयसूचकतेने मोठा अनर्थ टळला.सदर जखमींना उपचारासाठी मेहकर येथे रवाना करण्यात आले. गावांमधील बिबट्याच्या प्रवेशाने ग्राम मोळा व परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या शेती मशागतीसाठी शेतकरी संकटात सापडला आहे.
बिबट्याने पाण्याच्या शोधासाठी गावाकडे धाव घेतली. जंगलामधील पानथळे कागदावरच असल्याने, जंगलातील हिंस्त्र प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.