बुलडाणा, 8 मार्च : महिलादिनीच महाराष्ट्रातील भयानक घटना समोर आली आहे. खामगाव येथील चोवीस वर्षीय विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पीडित महिला रस्त्यावर उभी असताना तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने स्विफ्ट गाडीमध्ये बसवून नेण्यात आलं. पुढे गेल्यानंतर गाडीतील तरुणांनी तिला गुंगीचं औषध दिलं आणि शेगाव रोडवरील शेतात नेऊन गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. या तीन तरुणांसह गाडीमध्ये एक अजून महिलादेखील होती.
या बलात्कार प्रकरणी तीन पुरुष आणि एक महिला असे चार आरोपी असून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महिलादिनीच घडलेल्या या घटनेनंतर खामगाव परिसरात खळबळ उडाली आहे. तसंच या प्रकरणात एक महिलाही आरोपी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदनगरमध्येही महिलेवर अत्याचार
अहमदनगर तालुक्यातील आंबेवाडी इथं 70 वर्षाच्या महिलेवर अत्याचार करण्यात आले आहेत. त्यानंतर या महिलेला जबर मारहाण करण्यात आली आणि तोंडात बोळा कोंबून आरोपी फरार झाला. ही घटना घडल्यानंतर 12 वाजता पोलिसांना फोन केला होता. मात्र पोलीस त्यानंतर तब्बल 6 तासांनी आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रासाठी लाज आणणारी घटना, तरुणीच्या हत्येनंतर महिलादिनीच करावा लागला आक्रोश
महिलेला मारहाण केल्यानंतर गावकऱ्यांनी पीडितेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाने उशिरा mlc दिली त्यानंतर लगेच पीडित महिलेचे जबाब घेतला असून आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rape case