रवी शिंदे,प्रतिनिधी
भिंवडी, 23 जानेवारी : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना भिंवडीमध्ये घडली आहे. पोलिसांनी मातीवर उमटलेल्या पाऊलखुणांचा शोध घेवून आरोपींना गजाआड केलं आहे.
शांतीनगर,आझादनगर इथं राहणारा इम्रान सिकंदर खान (26 ) हा त्याच्या 20 वर्षीय मैत्रिणीसोबत ऍक्टिवा दुचाकीने फिरण्यासाठी पोगांव पाईपलाईन इथं गेला होता. दोघांमध्ये गप्पागोष्टी उरकल्यानं ते दोघेही रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी येण्यासाठी निघाले असता त्यांना पाच नराधमांनी भर रस्त्यात अडवून इम्रान याच्या डोक्याला गावठी कट्टा आणि चाकू लावून पाइपलाईनच्या बाजूला नेलं. या नराधमांनी पीडित तरुणीवर आळीपाळीने अमानूष बलात्कार केला.
बलात्कारानंतर पाचही नराधम फरार झाले. या घटनेनं भयभीत झालेला प्रियकर इम्रान यानं प्रेयसीला सोबत घेवून तालुका पोलीस ठाणे गाठले आणि त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील ,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिर्के, राजू सैदाने, गणेश आव्हाड आदींच्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
यावेळी बलात्कार झालेल्या पाईपलाइनलगतच्या मातीभरावावर नराधमांच्या पाऊलखूणा उमटल्या होत्या. त्या पाऊलखूणांचा शोध घेवून पोलिसांनी आजुबाजूच्या नागरी वस्तीत आरोपींचा शोध घेतला असता येवई हद्दीतील किशोर रघुनाथ लाखात (19 ) यास प्रथम ताब्यात घेवून कसून तपास केला असता त्याने अन्य चार जणांच्या साथीने अमानूष बलात्कार केल्याची कबुली दिली.
त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं फिरवून गुरुनाथ गोपाल बारी (23),हर्षद हिरामण मारले (19),अविनाश पुंडलिक जाधव ( 24),गणेश पवार (20) या पाचही नराधमांना ताब्यात घेऊन अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी या टोळक्याकडून गावठी कट्टा आणि धारदार चाकू जप्त केला असून या नराधमांच्या टोळीने यापूर्वीही पोगांव पाईपलाईन रोडवर प्रेमी युगुलांना गाठून बलात्काराच्या घटना केल्या असण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला आहे.
===========================