अकोला, 18 जानेवारी : अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत अकोला जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर मतमोजणीची सुरू करण्यात आली असून, 4 हजार 411 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीत होणार आहे. मात्र अशातच मतमोजणी केंद्राबाहेर एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला. सुरेश पांडुरंग गोपणारायन असं आरोपीचं नाव असून दीपक गोपणारायन असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हे दोघेही नात्याने सख्ख्ये चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.
2010 मध्ये आपल्यावर चाकूहल्ला केल्याचा राग मनात ठेवून आरोपीने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या पथकाने आरोपाल ताब्यात घेतले असून त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील गावागावांत निवडणुका निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील 224 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये 10 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 741 जागांसाठी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात सरासरी 74.17 टक्के मतदान झाले.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.