शिर्डी, 25 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (omicron) धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 100 पार गेली आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, लाखो भक्तांचे शक्तीस्थळ असलेले शिर्डीतील (sai mandir shirdi) साई मंदिराच्या नियमात बदल करण्यात आले आहे. यापुढे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मंदिरात प्रवेश असणार आहे.
शिर्डी साई संस्थानच्या वतीने साईदर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. यापुढे मंदिरात सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत दर्शन मिळणार आहे.
त्याचबरोबर, पहाटेच्या काकड आरतीत भाविकांना प्रवेश नसणार आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत काकड व शेजारती पार पडणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डी साई मंदिरामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी
दरम्यान, राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. विशेषत: युरोप तसंच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
- संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
- लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे. अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
-उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.