मुंबई, 16 सप्टेंबर: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिवसेना विरोधात भाजपनं नवा गेम प्लान आखला आहे. मुंबई महापालिकेतील भाजपच्या 65 नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं एक पत्र देवून विशेष महासभेची मागणी केली आहे. विशेष महासभेत मुंबई महापालिकेतील भोंगळ कारभाराला महापौर किशोरी पेडणेकर यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. एवढंच नाही तर त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार आहे.
हेही वाचा...दिशाच्या 'लिव्ह इन पार्टनर'चा जबाब महत्त्वाचा, नितेश राणेंच अमित शहांना पत्र
येत्या 28 सप्टेंबरला ही विशेष महासभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने आपली साथ दिली तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल, अशी आशा भाजपला आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.
कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
'या' मुद्द्यांमुळे मुंबईच्या महापौर अडकणार?
मुंबईतील विविध विषयांवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव करणार आहे. यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.
सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. मुंबईत अद्याप कोरोना रुग्णांवर नियंत्रणत आणण्यात यश आलेलं नाही. मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे तर मृत्यूदराचा आलेखही वाढता आहे.
RT-PCR चाचण्या वाढविण्यात आलं नाही. तर जेवणाचे चुकीचं 63 कोटीचे कंत्राट दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.
शिवसेनेचा अर्थसंकल्पातला वाटा 73 टक्के, भाजपचा 13 टक्के आहे. व्हीसीद्वारे फक्त स्वत:च्या सदस्यांना बोलू दिलं व त्यांच्यासमोर अर्थसंकल्प मंजूर केला. दुसरीकडे बेस्टची भरमसाठ बिलवाढ हा देखील मुद्दा त्यांच्या अविश्वास ठरावात नमूद करण्यात आला आहे.
हेही वाचा... नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या...
संकट काळात बेस्ट बस कर्मचा-यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. शिवाय 113 टक्के नालेसफाईचा दावा करण्यात आला होता, मात्र करीही मुंबई तुंबली का ? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा महापौरांविरोधातला अविश्वास ठरावही लवकर मांडता येणार नाही आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे.