गडचिरोली, 18 ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्यातील कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.
कसनेलीच्या जंगलात सी सिक्स्टी (C-60) कमांडो आणि माओवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या वर्षातील माओवाद्यांच्या विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं.
दुसरीकडे, तेलंगणा राज्यातही झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा..जळगाव हत्याकांड! आरोपींकडून गुन्हा कबूल, समोर आली डोकं सून्न करणारी माहिती
गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. यात दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी (15 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती.
नारेकसा जंगल परिसरात C-60 पथकाचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एक पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा मृतांमध्ये समावेश आहे. या चकमकीत पाच माओवादी जखमी झाले आहेत. घटनास्थळी माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य भास्कर देखील या कॅपमध्ये उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. 1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. या घटनेचा सूत्रधार भास्करच होता.
हेही वाचा..जरा पहा ना ठाकरे साहेब, शेतकरी मरणाच्या दारात... VIDEO पाहून तुम्ही व्हाल भावुक
दरम्यान, यापूर्वी 6 जुलै रोजी छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेचका पोलीस ठाणे क्षेत्रातील जंगलात ही चकमक झाली. यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. चकमकीनंतर जवानांनी 4 मृतदेहांना ताब्यात घेतले होते.