विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी, शिक्षण विभागाचा नवा प्रयोग

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी, शिक्षण विभागाचा नवा प्रयोग

मात्र काही जणांकडून 'एकचं पुस्तक' प्रयोगाला विरोध करण्यात येत आहे

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे हा पालकांबरोबर शिक्षकांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. शिक्षण विभागाने विविध प्रयत्न केले तरी हा प्रश्न काही सूटत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी  शिक्षण विभागाने नवा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक करण्यात येणार आहे. तीन महिन्यांमध्ये जो अभ्यासक्रम शिकविला जाणार असेल तो अभ्यासक्रम एक किंवा दोन पुस्तकांमध्ये तयार करण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभरात याचा अवलंब केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व विषयांचे एकच पुस्तक ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

कशी असेल पुस्तकाची रचना

प्रत्येक इयत्तेला सध्या तीन विषयांची स्वतंत्र पुस्तके आहे. मात्र नव्या प्रयोगानुसार तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी सर्व विषयांचं मिळून एक पुस्तक असणार आहे. वर्षाच्या वर्गवारीनुसार अशी तीन ते चार पुस्तके तयार करण्यात येतील. सध्या ठाणे महानगरपालिकेत अशा स्वरुपाचा प्रयोग करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र काही जणांकडून एकचं पुस्तक प्रयोगाला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्येही याला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published: January 20, 2020, 7:56 AM IST

ताज्या बातम्या