बीड, 09 जून : बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बीड कृषी विभागाला यश आले आहे. या रॅकेटचे गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून कापूस खरेदी करताना खात्री करूनच बियाणे खरेदी करा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पेरण्याचे दिवस असल्याने शेतकरी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याच्या तयारीत असल्याने मोंढ्यातील कृषी दुकानावर गर्दी आहे, याचाच फायदा घेत व्यंकटेश अॅग्रो एजन्सीचे मालक केदारनाथ रमेशलाल जाजू यांनी बीटी कापसाचे बोगस बियाणे शेतकर्यांना दिले. बोलगार्ड -2 ऐवजी बॉडीगार्ड देऊन फसवणूक करत असल्याची तक्रार जिल्हा कृषी विभागाला मिळाली यानंतर सापळा रचून कृषी विभागाने मारलेल्या छाप्प्यात कापसाचे बोगस बियाणे आढळून आले. शिवाय अनेक शेतकर्यांना कच्च्या पावत्या आढळून आल्या. प्रति नग हजार रुपये चढ्या दराने विक्री केली असली तरी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे येथून विक्री केल्याचे पाहणीत आढळून आले.
हेही वाचा - पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या
त्यानंतर व्यंकटेश अॅग्रोचे मालक केदारनाथ जाजू यांच्याविरुद्ध फसवणूक बि-बियाणे अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.
व्यंकटेश अग्रो एजन्सीमध्ये कापसाचे बोगस बियाणे आढळून आले. यामध्ये गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र असे बोगस बियाणे विक्री करणारे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात आढळून आलेल्या बियाण्यामध्ये बोलगार्ड ऐवजी बॉडीगार्ड या नावाने हे बियाणे मार्केटमध्ये कृषी विक्रेत्यांकडून बाजारात आणले जात असून या बाबतीत कृषी विभागाने बीडमधील केदार जाजु यांच्या मालकीच्या व्यंकटेश अग्रो एजन्सी दुकानावर कारवाई केली.
विशेष बाब म्हणजे, मुगाच्या बियाण्याच्या बॅगमध्ये कापसाच्या बोगस बियाण्यांची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे.
हेही वाचा -लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होतो का? WHOचा नवा खुलासा
'शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना प्रमाणित केलेले बियाणे तसेच पावती घेऊनच खरेदी करावी अन्यथा फसवणूक होऊ शकते याची खबरदारी घ्यावी', असंही कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
संपादन - सचिन साळवे