खेड, 2 ऑगस्ट: रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटात बोगस ई-पास घेऊन कोकणात येणाऱ्या प्रवाशांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस ई-पास घेऊन खासगी आराम बसने प्रवास करणाऱ्या 30 प्रवाशांना रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर पोलिसांनी पकडलं आहे.
हेही वाचा...आईनं शिवणकाम करून मुलासोबत केला अभ्यास, दहावीत मिळवलं घवघवीत यश
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ई-पासशिवाय शक्यतो प्रवेश बंदी आहे. या पार्शवभूमीवर तयार केलेले बोगस ई-पास घेऊन खासगी आराम बसने काही लोक प्रवास करताना आढळून आले. कशेडी नाक्यावर पोलिसांनी बस थांबवल्यानंतर सर्व प्रवाशांचे ई-पास स्कॅन करण्यात आले असता ते बोगस असल्याचं आढळून आलं. 30 प्रवाशांकडे असलेले पास बोगस आणि खोटे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे असलेले बोगस ई-पास देखील जप्त करण्यात आले आहेत.
4 हजार रुपयांत एजेंटकडून घेतला पास...
सध्या कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. या दरम्यान जिल्हाबंदी करण्यात आली आहे. ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही आहे. मात्र, बोगस ई-पास समोर आले आहेत. कोकणात येणारी एक खासगी बस पोलिसांनी कशेडी नाक्यावर तपासणीसाठी थांबवली.
बसमधील तब्बल 30 प्रवाशांकडे बोगस ई-पास आढळून आले आहे. या प्रवाशांनी एजेंटकडून ई-पास बनलल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येकी 4 हजार रुपये देऊन एका एजेंटने या प्रवाशांना फसवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी खासगी बस सध्या ताब्यात घेतली असून या बोगस ई-पास प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
पण...14 दिवस क्वारंटाइन राहावंच लागेल...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. कोरोना परिस्थितीमुळे गावाकडे येण्यास मनाई केली आहे. पण, आता रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना विना पास परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा...बाप्पा पावला, रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना अटी शर्थी घालून देण्यात आल्या आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्याना 14 दिवसांचा क्वारंटाइन पाळावाच लागेल, अशी सूचना देण्यात आली आहे. पण, आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास सर्व अटी शिथिल करण्यात आल्या आहे.