Home /News /maharashtra /

मराठी शाळेत शिकल्यानं 102 जणांना नोकरीतून डावललं, इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना प्राधान्य

मराठी शाळेत शिकल्यानं 102 जणांना नोकरीतून डावललं, इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना प्राधान्य

मुंबई महापालिकेत असा प्रकार घडला असून दहावी पर्यंत मराठी माध्यमात शिकलेल्या तब्बल 102 उमेदवारांना डावललं आहे.

  मुंबई, 29 जानेवारी : राज्यात एकीकडे मराठी सक्तीसाठी आग्रह सुरू असतानाच मराठी शाळेत शिकल्यानं नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई महापालिकेत असा प्रकार घडला असून दहावी पर्यंत मराठी माध्यमात शिकलेल्या तब्बल 102 उमेदवारांना डावललं आहे. या अजब प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक म्हणून 102 जणांची निवड करण्यात येणार होती. त्यासाठी 2017 मध्ये परीक्षाही घेतली गेली. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली होती. मराठी शाळांसह इंग्रजी शाळांसाठीही उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, निवड केलेल्या उमेदवारांचे दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात असल्याने इंग्रजी शाळेत त्यांची नियुक्ती करता येणार नाही असं कारण शिक्षण विभागाने दिलं आहे. मराठी शाळेत शिकल्याचं कारण देत ज्या 102 उमेदवारांना डावलण्यात आलं आहे त्यांच पदवीचं आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेत घेतलेल्या या उमेदवारांचे भवितव्य यामुळे टांगणीला लागलं आहे. तसेच केवळ दहावीपर्यंतचं शिक्षण मराठीतून घेतल्यानं डावलणं हा अन्याय असल्याची संतप्त भावना या उमेदवारांनी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मराठी माध्यमात शिकलेल्या या उमेदवारांना दुय्यम वागणूक दिल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागाकडून ज्या उमेदवारांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इंग्रजी शाळेत झालं आहे त्यांना प्राधान्य दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राज्यात मराठी शाळात शिकून काय करायचं, त्या शाळांचे भविष्य काय असा प्रश्न विचारला जात आहे. 'महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्यात, जरा आमच्या शाळा पाहा', केजरीवालांचा टोला

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: BMC

  पुढील बातम्या