मुंबई, 14 जानेवारी: विवाहबाह्य संबंधांची कबुली दिल्यानंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) राजीनामा देणार का याची चर्चा सुरू आहे. मंत्र्यांवरच बलात्कारासारखे आरोप झाल्याने ते गंभीर आहेत याची दखल घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यात NCP सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षातला एक मोठा गट मुंडेंच्या पाठिशी उभा आहे आणि त्यांनी दबाव निर्माण करायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar reaction on Dhananjay Munde)यांनी आरोप गंभीर असल्याचं वक्तव्य केल्यानंतर मुंडे राजीनामा देणार, अशी चर्चा सुरू झाली. पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर पक्षात धनंजय मुंडे यांचा समर्थक गट सक्रिय असल्याची जाणीव झाली.
ब्लॅकमेल
'अशा प्रकारे जर कोणी इतक्या वर्षांनी तक्रार करून ब्लॅकमेल करत असेल तर हे योग्य नाही', असं जयंत पाटील म्हणाले आहेत. याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर निर्णय झाला पाहिजे असा दबाव अजित पवार गटाने मांडल्याचं समजतं.
दबाव गट
धनंजय मुंडे हे जनता दरबारासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आले होते. जनता दरबार संपल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतील. दरम्यान या प्रकरणावर पत्रकारांशी बोलतना जयंत पाटील यांनी "एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाला मुद्दाम एखादी महिला बदनाम करत असेल त्या तक्रारीची दखल घ्यायलाच हवी. धनंजय मुंडे यांना ती महिला आज इतक्या वर्षांनी ब्लॅकमेल करत होती. त्याविषयी त्यांनी पोलिसातही तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी तपास केलेला नाही. मग मुंडे यांनी कोर्टातही दावा दाखल केला आहे. आता या प्रकरणी पोलीस तपास झाल्याशिवाय काही बोलणं चुकीचं आहे", असं सांगितलं.
"पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, पण पोलिसांचा निष्कर्ष येत नाही तोपर्यंत घाई करायचं कारण नाही", असं सांगत पाटील यांनी राजीनाम्याचा दबाव टाकणार नसल्याचेच संकेत दिले.
पवारांच्या 'गंभीर' प्रतिक्रियेविषयी त्यांना विचारलं असता पाटील म्हणाले, "आरोप गंभीर आहेत, यात शंका नाही. पण तातडीने त्या आरोपांची शहानिशा न करता प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. पोलीस तपास करत आहेत."
राजीनामा
दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणार का यावर बोलताना, "मला कोणीही अद्याप राजीनामा द्यायला सांगितलेला नाही. मी देखील राजीनामा दिला नाही. यापुढे पक्ष काय तो निर्णय घेईल", असं ते म्हणाले. या महिलेचा विषय 2 महिन्यापासून पक्ष पातळीवर माहीत आहे, असंही मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.
नवा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्याच एका नेत्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणी नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे यासंदर्भात राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बैठक सुरू असली, तरी दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याने आणि माजी आमदाराने धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच पोलिसांना पत्र लिहिलं आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळू शकतं. "रेणू शर्मा ही महिला हनी ट्रॅपिंग करते. ती मलाही जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात होती", असं पत्र माजी आमदार आणि आता भाजपत असेलेले नेते कृष्णा हेगडे यांनी थेट मुंबई पोलिसांना दिलं आहे. या महिलेविरोधात FIR दाखल करण्याची मागणीही हेगडे यांनी केली आहे.