सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची मागणी

प्रवीण दरेकर यांनी सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी केली आहे.

  • Share this:

बीड, 21 नोव्हेंबर : 'महाराष्ट्र हा एक आहे, त्यामुळे या एक असणाऱ्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळे निर्णय कसे घेऊ शकतात?' असा सवाल करत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी केली आहे.

बीडमधील विद्यार्थी मुलं नाहीत का? मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थीच मुलं आहेत का? असा सवाल देखील प्रवीण दरेकर यांनी बीडमध्ये बोलताना उपस्थित केला आहे. राज्यातील माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई, ठाणे वगळून उर्वरित जिल्ह्यांसाठी वेगळा नियम कसा काय? अशी टीका दरेकर यांनी केली आहे. शाळेची अवस्था, शिक्षकांचा पगार आणि पालकांची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्यदेखील महत्वाचे आहे. निर्णयात एकवाक्यता पाहिजे, सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी यावेळी दरेकर यांनी केली.

'ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एखाद्या महावितरणच्या कार्यालयात लिपिक म्हणून बसावे. तिथे भाजपचे पदाधिकारी वाढीव वीज बिलांचा गठ्ठा घेऊन येतील,' अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. वाढीव वीज बिलाबाबत जनेतला दिलासा देऊन वीज बिल कमी करण्याचे धोरण आखले पाहिजे. इथे मात्र मंत्रीच कर्मचाऱ्यांची कामे करायला निघाले आहेत, असा उपरोधिक टोला लगावत या नेत्यांचा आणि सरकारचा ताळमेळ नसल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 21, 2020, 10:17 PM IST

ताज्या बातम्या