युती झाली नाही तर शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकू - दानवे

युती झाली नाही तर शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकू - दानवे

'लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल.'

  • Share this:

जालना 25 जानेवारी : राज्यात युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक दावा केलाय. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केलाय. दानवेंचा हा दावा म्हणजे शिवसेनेला टोला समजला जातोय.

येत्या 28 तारखेला जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, "भाजपने 2014मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू पण कमी नाही, राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे. मतविभाजन होऊन त्याचा फायदा कांग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये, अशी आमची भूमिका आहे."

दरम्यान, याचवेळी सेनेकडून अर्ध्या जागा मागण्यात आल्याच्या प्रश्नावर, तसा कुठलाच प्रस्ताव सेनेकडून आला नाही आणि त्यासंदर्भात एकही बैठक झाली नसल्याचा दावा ही दानवे यांनी केला.

युतीवर चंद्रकांत पाटील काय म्हणाले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसंच 'युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल', असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या होणार यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.  मात्र चंद्रकांत पाटलांनीच निवडणुका वेगळा होणार असल्याचं जाहीर करत संभ्रम दूर केला आहे.

या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होणार आहे, एकत्र होणार नाहीत. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. युतीचं वैशिष्ट्यं असं आहे की, एखाद्या कुठल्याही  दिवशी अचानक युतीची घोषणा होईल.'

'काही पक्षांची 5 वर्षांनंतर बैठका होतात. शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात. युती इतकी भक्कम आहे की, सौम्य काय तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार आहे. काही तडे गेले असतील तरी ते भरुन निघतील.' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

First published: January 25, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading