अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ, सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ, सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक

विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरू ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच सभागृहात मोठा गदारोळ झाला. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरू ठेवण्यात आलं आहे.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी 'मी पण सावरकर' अशा टोप्या घालत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून भाजप सरकारला लक्ष्य करणार असल्याचं दिसत आहे.

भाजपचं धक्कातंत्र, विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची निवड

नागपूर अधिवेशन हे राजकीय दृष्ट्या कायम वादळी आणि खळबळजनक ठरलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसं पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेलं नाही. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळत आहेत.

काँग्रेसच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेची खोचक टीका, महाविकास आघाडीत जुंपणार?

अधिवेशनातील रणनीतीचा भाग म्हणून, सावरकरांचा मुद्दा हा राज्यभर तापवण्याची योजना भाजपने आखली आहे. भाजप राज्यभर 'मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर' कँपेनला सुरुवात केली आहे. याआधी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर तडजोड नाही असं काँग्रेसला सुनावलं होतं. त्याचबरोबर सावरकर हे महान देशभक्त होते. आम्ही नेहरूंना, गांधी मानतो, तुम्ही सावरकरांना माना असं म्हटलं होतं. काँग्रेस-शिवसेनेच्या या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या