विधानसभेसाठी भाजपचा सर्व्हे तयार, महायुतीला इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

विधानसभेसाठी भाजपचा सर्व्हे तयार, महायुतीला इतक्या जागा मिळण्याचा अंदाज

विधानसभा निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हे भाजपने केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.

विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.

काय आहे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत?

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाल्यास तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या मित्रपक्षांसह लढल्यास महायुतीला 229 जागा मिळतील, असं भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याचं भाजपच्या एका मंत्र्यांचं म्हणणं आहे. भाजपच्या मंत्र्याच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र या आकड्यांच्या साहाय्याने विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून होईल, असं चित्र आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेदेखील मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा दावा सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून युतीतच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जुलै महिन्यातही भाजपने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेतील आकडे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारे होते. कारण या सर्व्हेनुसार विधानसभेत स्वबळावर लढूनही भाजपला बहुत मिळण्याचा दावा करण्यात आला होता.

काय होता भाजपचा आधीचा सर्व्हेत?

'विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत लढल्यास युतीला 200 जागा मिळतील तर आघाडीच्या वाट्याला 88 जागा येतील. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला 160, शिवसेना 90 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 38 जागांपर्यंत थांबेल. तसंच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला 230 जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावं लागेल,' अशी आकडेवारी भाजपच्या जुलै महिन्यात केलेल्या सर्व्हेतून समोर आल्याचं सरकारमधील एका मंत्र्यानं सांगितलं होतं.

मुख्यमंत्री कुणाचा, भाजप-सेनेत कुरघोडी

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असं सांगत आहेत तर दुसरीकडे शिवसेनादेखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलंय, असं सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

VIDEO: नाना पाटेकर यांनी 'या' कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या