मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई काबीज करायचं ध्येय, भाजपच्या गोटात हालचालींना वेग, शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागणार?

मुंबई काबीज करायचं ध्येय, भाजपच्या गोटात हालचालींना वेग, शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागणार?

भाजप पक्ष मुंबईत लागला कामाला

भाजप पक्ष मुंबईत लागला कामाला

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप पक्ष सर्वात जास्त आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेषत: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप पक्ष सर्वात जास्त आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपकडून मिशन मुंबईला सुरुवात करण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आणण्याच्या या ध्येयाला मिशन मुंबई असं नाव देण्यात आलं आहे. हे मिशन साध्य करण्यासाठी अगदी तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचा मुंबई पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या दोघांचा मुंबईच्या विविध भागात सत्कार करण्यात आला. या दोघांनी मिळून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील 3 महत्वाच्या ठिकाणांना भेट दिली. दादर चैत्यभूमी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान या तीनही ठिकाणी या दोघांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ('सागर'वर मोठ्या घडामोडी, मोहित कंबोज-रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला) भाजप मुंबईचे सचिव सचिन शिंदे यांनी दादरमध्ये या दोघांचे स्वागत केले. या तीन ठिकाणांना भेट देण्यापूर्वी बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बावनकुळे आणि शेलार या दोघांचा प्रत्येक ठिकाणी सत्कार करण्यात आला. या भेटीगाठींच्या कार्यक्रमाद्वारे भाजपने मिशन मुंबईला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावणार? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. या फुटीमुळे शिवसेनेला कदाचित मुंबई महापालिकेत फटका बसू शकतो. पण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जनमत नेमकं कुणाच्या बाजूला असेल हे आताच सांगणं कठीण आहे. पण तरीही भाजप शिवसेनेला धक्का देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. भाजपची त्यासाठी पूर्ण तयारी देखील झाल्याचं चित्र आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, BMC, Shiv sena

    पुढील बातम्या