भाजप खासदाराला कोणत्याही क्षणी होणार अटक, फसवणूक करणं पडलं महागात

भाजप खासदाराला कोणत्याही क्षणी होणार अटक, फसवणूक करणं पडलं महागात

जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणूक लढवताना आयोगाकडे दाखल केलेले जातप्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं.

  • Share this:

सोलापूर, 21 मार्च : भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने खासदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणूक लढवताना आयोगाकडे दाखल केलेले जातप्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं होतं. जातपडताळणी समितीने खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.

यापूर्वीच गुन्हा दाखल

भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमानपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी जयसिद्धेश्वर यांच्याविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 156/ 3 प्रमाणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांच्या समोर अडचणी वाढल्या आहे.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून विजय मिळवणाऱ्या लिंगायत समाजातील आदरणीय गुरू असणाऱ्या जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती.

हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं.

जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले.

सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे याठिकाणी इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही. जात पडताळणी समितीनं जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. या समितीच्या निर्णयाविरोधात स्वामी उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

First published: March 21, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading